लसीकरणसाठी डॉक्टरांना कोविल ऍप वर नोंदणी करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
लसीकरणसाठी डॉक्टरांना कोविल ऍप वर नोंदणी करणे बंधनकारक - जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी
हिंगोली - कोरोना प्रादुर्भाव होऊ नये यासाठी जानेवारी महिन्यात लस उपलब्ध होणार असल्याने पहिल्या टप्यात शासकीय डॉक्टर, खाजगी डॉक्टर, नर्स यांना लस दिली जाणार आहे. यासाठी कोविल ऍप वर सर्वांनी नोंदणी करणे बंधनकारक असल्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सांगितले.
येथील जिल्हा नियोजन सभागृहात बुधवारी कोरोना लसीकरनाच्या पूर्व तयारीसाठी उपययोजना व त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आढावा बैठक घेण्यात आली यावेळी ते बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे प्रभारी आरोग्य अधिकारी डॉ. राहुल गीते, जागतिक आरोग्य संघटनेचे विभागीय प्रतिनिधी मुजीब सय्यद यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.या बैठकीला उपविभागीय अधिकारी, अतुल चोरमारे, प्रशांत खेडेकर ,महिला बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, माध्यमिक शिक्षण अधिकारी पी. बी. पावसे ,बालविकास प्रकल्प अधिकारी, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, यांच्यासह वैद्यकीय अधिकारी आदींची उपस्थिती होती.
दरम्यान, आरोग्य यंत्रणा, शिक्षण विभाग, महिला बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड लसीकरण मोहीम जिल्हाभरात राबविण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेने तीन हजार कर्मचारी नियुक्त केले आहेत.त्यानुसार आरोग्य विभागाकडे लस येताच पहिल्या टप्प्यात वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, खाजगी डॉक्टर यांना लस दिली जाणार असून त्यासाठी कोविल ऍप वर नाव नोंदणी करणे आवश्यक असल्याचे सांगून त्यासाठी आतापासून नियोजन करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.