अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची बुधवारी होणार तपासणी
अनुकंपाधारक ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची बुधवारी होणार तपासणी
उपमुख्य कार्यकारी अधिकारी माळी यांची माहिती
हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या २०१९-२० चालू वर्षासाठी शासन तरतुदीनुसार अनुकंपा उमेदवारांची निवड व नियुक्ती प्रक्रिया देण्याची कारवाही सुरु आहे. त्यामुळे जुलै२०२० अखेर अनुकंपाधारक उमेदवारांच्या जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची तपासणी बुधवारी( ता.१४) षट्कोनी सभागृहात सकाळी नऊ वाजता केली जाणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी सांगितले.
मागील अनेक वर्षापासून जिल्हा परिषदेच्या अनुकंपा धारकांच्या व सेवा जेष्ठता यादीनुसार जागा भरल्या जात नव्हत्या ,त्यातच पुन्हा कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने ही प्रक्रिया थंडावली होती. आता कोरोना संसर्ग प्रमाण कमी अधिक असल्याने शासनाने जेष्ठता यादीनुसार अनुकंपा धारकांची निवड प्रक्रिया राबवून नितुक्ती देण्याचे आदेश जिल्हा परिषद प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार जुलै २०२० अखेर अनुकंपा धारक जेष्ठता यादीतील ७० उमेदवारांचा यात समावेश आहे. ही प्रक्रिया बुधवारी (ता.१४) सकाळी नऊ वाजता जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात सुरु होणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता मास्क, सानिटायझर ,सामाजिक अंतर पाळत व शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे लागेल.
ज्या उमेदवारांना सर्दी, खोकला, ताप या कोरोना आजाराची लक्षणे आहेत,आशा उमेदवारांना त्यांच्या प्रतिनिधीला या कार्यालयाच्या पूर्व परवानगीने पाठवता येईल. ज्या उमेदवारांचे भ्रमण ध्वनी, किंवा ईमेल ,व्हाट्सअप नंबर कार्यालयाकडे आहेत अश्याना यादिवशी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या जाणार आहेत.या दिवशी जे उमेदवार गैरहजर असतील त्यांचे नंतर आक्षेप, हरकत नोंदविल्यास ती ग्राह्य धरल्या जाणार नाही. कार्यालयातील उपलब्ध अभिलेख्या वरून पुढील कारवाई केली जाणार आहे.कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता या दिवशी उमेदवारांच्या आरोग्याची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक तैनात केले जाणार आहे.उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधी शिवाय सभागृहात कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.याची उमेदवारांनी नोंद घ्यावी,तसेच सर्व सूचनांचे पालन करणे अनुकंपा धारक उमेदवारांना बंधनकारक आहे.असे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडून केले आहे.