हिंगोलीतील उद्योजकाची साडे तीन कोटीची फसवणुक करणाऱ्या पुणे येथील दांपत्या विरुध्द गुन्हा
हिंगोलीतील उद्योजकाची साडे तीन कोटीची फसवणुक करणाऱ्या पुणे येथील दांपत्या विरुध्द गुन्हा
हिंगोली - हिंगोलीच्या उद्योजकाकडून पोल्ट्री फिड साठी लागणारी १२३३ मेट्रीक टन ढेप खरेदी करून पैसे न देता ३.३५ कोटी रुपयांची फसवणुक केल्या प्रकरणी पुणे येथील साकार पोल्ट्री प्रायव्हेट लिमीटेड कंपनीच्या संचालक दांपत्यावर हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार येथील हिंगोली एमआयडीसी औद्योगिक वसाहतीत ज्ञानेश्वर मामडे यांच्या मालकिची शिवा पार्वती पोल्ट्री फिड प्रायव्हेट लिमीटेड या नावाची कंपनी मागील अनेक वर्षपासून आहे. या ठिकाणी सोयाबीन पासून पोल्ट्री फिड साठी ढेप तयार केली जाते. सदरील ढेप राज्यभरातील विविध कंपन्यांना मागणी नुसार पुरवली जाते. त्यानुसार पुणे येथील साकार पोल्ट्री प्रा. लिमीटेड साकोरे नगर सोसायटी, लोहगाव पुणे या कंपनीने ढेपेचा पुरवठा करण्याची मागणी शिवा पार्वती कंपनीकडे नोंदवली होती. त्यानुसार सन २०११ पासून त्यांचा व्यवहार सुरु झाला.
मात्र २९ मार्च २०१७ ते १४ जुलै २०१७ या कालावधीत साकार कंपनीला त्यांच्या मागणीनुसार ६७ ट्रक मध्ये १२३३ मेट्रीक टन ढेप पुरवठा करण्यात आली. या ढेपेची किंमत ३.३५ कोटी रुपये एवढी आहे. त्यांच्या मागणी नुसार ढेप पुरवठा केल्यानंतर संबंधीत कंपनीचे संचालक मंगेश धुमाळ व शितल मंगेश धुमाळ या दाम्पत्याने पैसे देण्यास टाळाटाळ चालवली होती. सदर प्रकार लक्षात आल्यानंतर उद्योजक मामडे यांनी वेळोवेळी पुणे येथे कंपनीच्या कार्यालयात जाऊन मंगेेश धुमाळ यांना पुरवठा केलेल्या ढेपेचे पैसे देण्याची मागणी केली. मात्र त्याने आज देतो, उद्या देतो असे म्हणून पैसे देण्यास टाळाटाळ सुरु केली. त्यामुळे आपली फसवणुक झाल्याचे लक्षात आल्यानंतर मामडे यांनी बुधवारी हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यामध्ये साकार कंपनीच्या संचालकांनी ३ कोटी ३५ लाख १७ हजार ९०९ रुपयांची फसवणुक केल्याचे तक्रारीत नमुद केले. यावरून पोलिसांनी साकार पोल्ट्री प्रा. लि. साकोरेनगर सोसायटी, लोहगाव पुणे या कंपनीचे संचालक मंगेश धुमाळ व शितळ धुमाळ यांच्या विरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, सदर प्रकरण आर्थिक बाबींशी संबंधीत असल्याने प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला असून पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरक्षक एस. एस. दळवे पुढील तपास करीत आहेत.