हिंगोली जिल्ह्यात ६३ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
जिल्ह्यात ६३ हजार कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण
हिंगोली, - जिल्ह्यात माझे कुटुंब-माझी जबाबदारी मोहिमे अंतर्गत (ता.२२) सप्टेंबर अखेर ६३हजार ३३३ कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. या सर्वेक्षणा दरम्यान कोव्हिड आजाराची ८ रुग्ण, इतर आजाराची २ हजार ३१८ रुग्ण असे एकूण २ हजार ३२६ संशयित रुण आढळून आले आहेत. तर कोमार्बीड व्यक्तींची संख्या २५६ एवढी आढळून आली आहे. या सर्व रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
जिल्ह्यात ही मोहिम प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. या मोहिमेसाठी ५९५ पथके स्थापन करण्यात आली असून, या पथकामध्ये एक हजार ७८५ कर्मचाऱ्यांची तसेच प्रत्येक ५ते १० पथकामागे एक याप्रमाणे उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी ३७ वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संशयित रुग्णांना संदर्भीत करण्यासाठी २९ ॲम्ब्युलन्स उपलब्ध करुन देण्यात आले आहेत.
या मोहिमे दरम्यान गृहभेटीच्या वेळी विरीत करण्यासाटी ३ लाख पाँप्लेट तयार करण्यात आले आहेत. तसेच २५ होर्डींग्ज व दोन हजार साहसे बॅनर्स तयार करण्यात आली आहेत. तसेच समाज माध्यमावर जनजागृतीसाठी फेसबुक साठी १५ तर व्हॉट्सॲप साठी १२३ संदेश तयार करण्यात आले आहेत. युनिसेफ व आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती करण्यासाठी दोन व्हिडिओ तयार करण्यात आले आहेत.
या मोहिमेसाठी ग्राम, तालुका व जिल्हास्तरावरील लोकप्रतिनिधींचे सहकार्य लाभत असल्याचे शेवटी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.