हिंगोली : पोलीस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी
पोलीस निरीक्षकाचा कोरोनाने घेतला बळी
हिंगोली - येथील राज्य राखीव दलाचे पोलीस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांचे बुधवारी सायंकाळी औरंगाबाद येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला.ते औंढा नागनाथ तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते.
येथील राज्य राखीव बल गट क्रमांक १२ चे पोलीस निरीक्षक कुंडलिक अंभोरे यांना मागील आठवड्यात कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची तपासणी केली असता
त्यांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर येथील सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद देत नसल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे हलविण्यात आले असता या ठिकाणी त्यांच्यावर उपचार सुरू होते .त्यांनी पन्नाशी ओलांडली होती . त्यामुळे उपचाराला प्रतिसाद देत नव्हते, अखेर त्यांचा कोरोनाने बळी घेतल्याने राज्य राखीव दलात शोककळा पसरली आहे.
कुंडलिक अंभोरे हे औंढा तालुक्यातील गलांडी येथील रहिवासी होते. त्यांचा सेवानिवृत्तीचा काळ ही अवघा सहा वर्षे बाकी होता . त्यांनी उत्कृष्ट सेवा बाजावल्यामुळे त्यांची राष्ट्रपती पुरस्कारासाठी पात्र देखील ठरले होते .विशेष म्हणजे येणाऱ्या कालखंडात त्यांना राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार होते.मात्र राष्ट्रपती पुरस्कार न स्वीकारताच त्यांच्यावर काळाने घाला घातला. त्यांची परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी खूप अडचणीवर मात करीत राज्य राखीव दलात भरती झाले. त्यांचा स्वभाव मनमिळावू असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यासोबत कोणताही रुबाब न दाखवीता मन मोकळे पणाने वागत असत, अधिकारी, कर्मचारी देखील त्यांच्यावर एखादया कुटुंबा सारखे प्रेम करीत होते. गरीब परिस्थितीवर मात करीत अख्या कुटुंबाचा गाडा सांभाळत होते. मात्र त्यांनी कोरोनावर मात करू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. कोविड योद्धा निघून गेल्याने राज्य राखीव दलातील सर्व अधिकारी, कर्मचारी अंभोरे यांच्या दुःखात सहभागी झाले आहेत.गुरुवारी औरंगाबाद येथे महा पालिकेच्या वतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.