38 कोरोना पॉझिटिव्ह आमदार अधिवेशनाला गैरहजर.

आमदारांनी अनुभवला सामान्य नागरिकांसारखा त्रास; प्रवेशासाठी ताटकळले रांगेत 
विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा.
38 कोरोना पॉझिटिव्ह आमदार अधिवेशनाला गैरहजर.
मुंबई : आजपासून विधिमंडळाचं दोन दिवसीय पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरवणी मागण्या आणि काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी दोनच दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. यासाठी सर्व मंत्री, आमदार, अधिकारी, पीए, पत्रकार यांची कोराना चाचणी केली जाणार आहे. ज्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह येईल त्यांनाच अधिवेशनासाठी हजर राहता येणार असल्याचं प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं होतं. परंतु, अनेकांच्या कोरोना चाचणीचा अहवाल न मिळाल्याने त्यांना विधानभवनात प्रवेश देण्यात आला नाही. त्यामुळे विधानभवन परिसरात कर्मचारी आणि नेत्यांच्या रांगा पाहायला मिळाल्या. अनेकांना विधानभवन परिसरात प्रवेश मिळवण्यासाठी खटाटोप करावा लागला.
आमदारांना लवकर विधानभवनात सोडा, अजित पवार यांची सूचना
अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विधिमंडळ परिसरात कमालीचा संभ्रम पाहायला मिळाला. कारण अनेकांना त्यांच्या कोरोना चाचणीचे अहवाल मिळाले नव्हते. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार विधिमंडळ परिसरात दाखल होताच, तेथे उपस्थित असलेल्या सर्व आमदरांनी त्यांना हा सर्व प्रकार सांगितला. सर्व प्रकार ऐकून घेत अजित पवारांनी सर्व सिच्युएशन आपल्या हातात घेतली. सदर प्रकरणाची तत्काळ दखल घेत अजित पवारांनी विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत यांना बोलावून घेतलं. तसेच सर्व आमदारांचे रिपोर्ट्स अद्याप का आलेले नाहीत, याबाबत
विचारणा केली. तसेच काही आमदारांनी वैयक्तिक चाचण्या केल्या आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडे त्या चाचण्यांचे अहवाल असतील आणि ते नेगेटिव्ह असतील, तर त्यांना आतमध्ये सोडा अशा सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत.
विधिमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधानभवनात दाखल होताच, भाजप आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली. हातात बॅनर घेऊन भाजप आमदार पायऱ्यांवर उपस्थित होते. वैद्यकीय प्रवेशासाठी असलेलं प्रादेशिक आरक्षण रद्द करा, अशी मागणी भाजप आमदारांच्या वतीने करण्यात आली. मराठवाड्यातील भाजप आमदरांनी ही मागणी केली. मुख्यमंत्री आणि पर्यावरण मंत्री यांनी आंदोलन करणाऱ्या आमदारांसमोर हात जोडले. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या आमदारांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन थांबलं.
दरम्यान, विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु झालं असून विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली. तसेच कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे 38 आमदार विधिमंडळाच्या या अधिवेशनाला गैरहजर राहणार आहेत


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा