हिंगोलीत विविध मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
हिंगोलीत विविध मागण्यासाठी पालिका कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
कामकाज ठप्प, कार्यालय ओस
हिंगोली - येथील नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी सोमवारी एक दिवशीय काम बंद आंदोलन अग्निशमन दल परिसरात केल्याने कामकाज ठप्प पडले तर कार्यालय देखील ओस पडले होते.
महाराष्ट्र राज्य नगर परिषद कर्मचारी, संवर्ग कर्मचारी, सफाई कामगार, नगर परिषद हिंगोली यांच्या वतीने आज एक दिवशी काम बंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्यात सातवा वेतन आयोगाचा पहिला हप्ता रोखीने देणे, शंभर टक्के वेतन शासनाच्या कोषागार कार्यालयातून देण्यात यावे, नगर परिषद पंचायतीच्या कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, रोजंदारी कर्मचाऱ्यांचे एकाच वेळी समावेशन करणे, अभियंता अग्निशमन दल लेखा व अधिकाऱ्यांना प्रशासकीय सेवांच्या निवड श्रेणी लागू करणे, नगरपरिषद कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध आराखडा तयार करणे, सफाई कर्मचार्यांना मोफत घर बांधून देणे, सफाई कर्मचार्यांना शासकीय सुट्टी तसेच रविवार शनिवार सुट्टी लागू करण्यात यावी, स्वच्छता निरीक्षकांचा संवर्ग तयार करणे, २००५ च्या कर्मचाऱ्यांना डीसीपीएस, जुनी पेन्शन योजना लागू करणे, अशा विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले.यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
यावेळी राज्यध्यक्ष विश्र्वनाथ घुगे, अभियंता रत्नाकर अडसरे, जिल्हाध्यक्ष बाळू बांगर, श्याम माळवटकर, संदीप घुगे, विजय खिलारे, मुंजाजी बांगर, गजानन आठवले, यांच्यासह इतर कर्मचारी व महिला कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.