झेडपीच्या आरोग्य विभागाला कोरोनाचे ग्रहण, विभागप्रमुखासह ,एका कर्मचाऱ्याला बाधा, जीपत खळबळ
झेडपीच्या आरोग्य विभागाला कोरोनाचे ग्रहण
विभागप्रमुखासह ,एका कर्मचाऱ्याला बाधा, जीपत खळबळ
हिंगोली - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाला लागलेले कोरोनाचे ग्रहण काही पिच्छा सोडत नाही, पुन्हा गुरुवारी विभाग प्रमुखासह एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यात खळबळ उडाली आहे. त्यामुळे आज देखील जीप मध्ये शुकशुकाट दिसून येत होता.
दरम्यान, मागील महिन्यात आरोग्य विभागातील दोघा डॉक्टर सह, कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण विभागातील अधिकारी, कर्मचारी असे एकूण चाळीस जणांना सेनगाव तालुक्यातील कवठा येथे क्वारंटाईन केले होते. मात्र सर्वांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने पाच सहा दिवस कार्यालय शील केले होते. ही घटना ताजी असताना पुन्हा जिल्हा परिषदेच्या सीईओ राधाबीनोद शर्मा यांना कोरोनाची लागण झाल्याने संपूर्ण इमारत सानिटाईझ करून विभाग प्रमुखासह दहा कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करून त्यांचे स्वाब नमुनेप्रयोग शाळेकडे पाठविले होते.
त्यामुळे जिल्हा परिषदेचे कामकाज तीन दिवस बंद करण्यात आले होते.
मात्र त्यानंतर सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने पुन्हा विभाग प्रमुखांना होम क्वारंटाइन करण्यात आल्याने तीन दिवसानंतर हीजिल्हा परिषदेच्या कार्यलयात मोजकेच कर्मचारी येऊन काम करत होते. कोरोनाची चांगलीच धास्ती कर्मचाऱ्यांनी घेतली असल्याने गुरुवारी देखील कार्यालयात सामसूम दिसून येत होते.
जिल्हा परिषदेची विस्कटलेली घडी सुधारण्यासाठी प्रयत्न चालविले जात असताना त्यातच पुन्हा गुरुवारी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्यासह प्रशांत तुपकरी या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने पुन्हा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यामध्ये भीती निर्माण झाली असल्याचे चित्र आहे. कोरोना विषाणू काही आरोग्य विभागाचा पिच्छा सोडत नाही की काय असे दिसून येत आहे. आता पुन्हा आरोग्य विभाग सील करावा लागणार आहे.
अगोदरच सीईओ शर्मा सह ,विभाग प्रमुख यांच्यासह काही कर्मचारी होम क्वारंटाइन जिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांनी कोरोनाची धास्ती घेत पाठ फिरविल्याने जिल्हा परिषद सध्या सलाईनवर आहे, आता तर पुन्हा आरोग्य विभागातील दोघे जण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने पुन्हा जिल्हा परिषदेचे कामकाज ठप्प करण्याची वेळ आली आहे. आता या दोघांच्या संपर्कातील कोण कोण व्यक्ती आले आहेत यांचा शोध घेतला जाणार असून, येत्या काही दिवसात जिल्हा परिषदेच्या कार्यल्यातील सर्वच विभागातील कर्मचाऱ्यांची रॅपिड अँटीजन टेस्ट घेतली जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.