हिंगोली जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी
जिल्ह्यात गुरुवारपासून १४ दिवस
लॉकडाऊन ,आतापर्यन्त दुसरी मोठी टाळेबंदी
जिल्हाधिकारी जयवंशी यांची पत्रकार परिषदेत माहिती
हिंगोली - शहरासह जिल्हाभरात कोरोना रुग्णाची वाढती संख्या पाहता ,हा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण जिल्हाभरात सहा ते १९ ऑगस्ट या कालावधीत १४ दिवसाचा लॉकडाऊन लागू करणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. त्यामुळे आतापर्यंतची जिल्ह्यातील ही दुसरी संचारबंदी आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.३) जिल्हाकचेरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी जयवंशी बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा माहिती अधिकारी अरुण सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.
जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या कमी होण्याऐवजी वाढत आहे. त्यामुळे मागील काही दिवसापूर्वी जिल्हा व्यापारी संघाने जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासाठी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. आता तर लोक प्रतिनिधी, पदाधिकारी, उच्य पदस्थ अधिकाऱ्यांनाही कोरोना लागण झाल्यामुळे जिल्हा आरोग्य यंत्रणा चांगलीच हतबल झाली आहे . त्यामुळे जिल्ह्यातील वाढत्या आकडेवारीचा आलेख पाहता जिल्हाधिकारी
जयवंशी यांनी हा निर्णय घेतला आहे.
पुढे ते म्हणाले , कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शेजारील जिल्ह्यात नांदेड, लातूर, परभणी, आदी जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यात आले होते. परंतु आपल्या जिल्ह्यात आता परिस्थिती पाहून निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. गुरुवार पासून १४ दिवस कडक संचारबंदी लागू करण्यात येत असल्याने सर्व आस्थापना बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी दोन दिवसात भाजीपाला, किराणा सामान घेऊन जावे, मेडिकल व प्रशासकीय कार्यलय वगळता सर्व आस्थापना बंद राहतील असे सांगून केवळ बँकेतील अंतर्गत कामकाज चालणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळेस कडक संचारबंदी राहणार असून रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही असे ते म्हणाले.
खोटे नाटे आरोप करणाऱ्या,व खोटी व्हिडीओ व्हायरल करून प्रशासनाची दिशाभूल करणाऱ्या खाजगी डॉक्टरांचा चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, डॉ. काबरा हे तिसऱ्या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आले तर डॉ. भोसले देखील कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. डॉ.भोसले यांनी खोटी व्हिडीओ व्हायरल करून रुग्णालयात कोणत्याच सुविधा नसून प्रशासनावर ताशेरे ओढले होते. मात्र जिल्हाधिकारी जयवंशी यांनी त्या आरोपात काही ही तथ्य नसून हे दोघेही डॉक्टर खोटे व बिनबुडाचे आरोप करीत असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.काही लोक प्रशासनाचे मानसिक खच्चीकरण करीत आहेत. त्यामुळे माझ्याकडे काही तक्रारी आल्या होत्या त्यानुसार मी स्वतः वसमत कोरोना सेंटर, सेनगाव ,हिंगोली आदी ठिकाणी भेटी दिल्या आहेत आणि सर्व शंकाचे निरसन केले असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात मृत्यू दर कमी असून रुग्ण बरे होण्यात जिल्हा आघाडीवर असल्याचे सांगून आरोग्य यंत्रणा, पालिका प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. लॉकडाऊन काळात सर्व नागरिकांची अँटीजन टेस्ट केली जाणार आहे.तसेच सध्या आपल्याकडे १७०० टेस्ट किट असून, आणखी एक लाख किट उपलब्ध करून देण्याची मागणी केली असल्याचे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात काही तक्रारी असतील तर मला कळवा मी आपल्या तक्रारीचा निपटारा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे जयवंशी यांनी सांगितले.