हिंगोलीत संचारबंदीच्या विरोधात वंचितचे डफली आंदोलन फुटकळ व्यवसाय सुरू करण्याची मागणी
हिंगोलीत संचारबंदीच्या विरोधात वंचितचे डफली आंदोलन
फुटकळ व्यवसाय सुरू करण्याची मागणी
हिंगोली- कोरोनाने सर्वच जण हैराण झालेले आहेत. हातावर पोट असणाऱ्यांचे तर एक वेळची देखील चूल पेटने मुश्कील होऊन बसले आहे. गोर गरिबांचा अजिबात विचार न करता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ६ ते १९ असा १४ दिवसांचा लॉकडाऊन लागू केला आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संपुर्ण महाराष्ट्र भर डफली वाजवून आंदोलन केले, त्याच पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातही डफली वाजवत शासनाचा निषेध केला. शासनाविरुद्ध घोषणाबाजी केल्याने परिसर दणाणून सोडला होता.
कोरोनामुळे सर्वसामान्यांचे जीवन जगणे कठीण होऊन बसले आहे, हिंगोली जिल्ह्यांमध्ये असे अनेक कुटुंब आहेत त्या कुटुंबातील व्यक्तीने जेव्हा काम करावं तेव्हा त्यांच्या घरातली चूल पेटत आहे. प्रत्येकाची रोजमजुरीवर गुजरान सुरू असून करण्यात आलेल्या लॉकडाऊन मूळे त्यांचा रोजगार हा थांबला आहे. तर फुटकळ व्यवसायिक देखील लॉकडाऊनमुळे चांगलेच अडचणीत सापडले आहेत .वास्तविक पाहता संचारबंदीचा काळ कमी करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने यापूर्वी देखील गांधी चौक येथे हात गाड्यावर चपल व जोडे विक्रीचा व्यवसाय सुरू केला होता. तरी देखील प्रशासनाने लॉकडाऊनचा कालावधी कमी केलेला नाही. ही परिस्थिती एकट्या हिंगोली जिल्ह्याची नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे प्रत्येक जण अडचणीत सापडलेले आहे.
आगोदर तीन महिने केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यात भर आता या परत करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पडली आहे. त्यामुळेच ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन केले. हिंगोली येथील आंदोलनात रवी वाढे, वसिम देशमुख, ज्योतीपाल रणवीर आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते. तर पोलीस प्रशासनाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.अन्यथा संचारबंदी मागे न घेतल्यास पुन्हा आंदोलन छेडणार असल्याचा इशारा वंचित आघाडीने दिला आहे.