हिंगोली, पेरजाबाद येथे लसीकरणास जाण्यासाठी नदी पात्रातून करावा लागतो प्रवास
पेरजाबाद येथे लसीकरणास जाण्यासाठी नदी पात्रातून करावा लागतो प्रवास
आरोग्य कर्मचाऱ्यासह गावकऱ्यांचा जीव धोक्यात
हिंगोली - औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथे लसीकरण करण्यास जाण्यासाठी जवळा बाजार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना चक्क पुर्णा नदीचे पात्र ओलांडून गावात जावे लागत असल्याने कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे . या ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्याच्या गावकऱ्यांच्या मागणीकडे प्रशासनाचे साफ दुर्लक्ष होत आहे .
औंढा नागनाथ तालुक्यातील पेरजाबाद येथून पुर्णा नदी वाहते गावकऱ्यांना गावात जाताना नदी पात्रातून जावे लागते. नदीवर पुल बांधावा अशी अनेक वर्षाची गावकऱ्यांची मागणी आहे, मात्र याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पावसाळ्यात नदीला पूर आल्यावर गावकऱ्यांना पेरजाबाद येथून नऊ किलो मिटर अंतरावरील पोटा मार्गे औंढा नागनाथ व नंतर जवळाबाजार असा तीस ते पस्तीस किलो मिटर अंतराचा प्रवास करावा लागतो. त्यामुळे पावसाळ्यात गावकऱ्यांची गैरसोय होते. दरम्यान , जवळाबाजर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला या गावात लसीकरणासाठी जावे लागते . गरोदर माता , स्तनदा माता यांना मार्गदर्शन तसेच बालकांचे लसीकरण करण्याचे काम करावे लागते . त्यासाठी महिला आरोग्य कर्मचाऱ्यांनाही या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे .
सध्या लसीकरणाचे काम सुरु आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना पुर्णा नदी पात्रांच्या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे या नदी पात्रात पुल उभारावा अशी मागणी जोर धरत आहे.
मागच्या अनेक वर्षांपासून गावकऱ्यांना ये- जा करण्यासाठी नदी पात्रातून पावसाळ्यात देखील जावे लागते शालेय विद्यार्थ्यांना पावसाळ्यात शाळेत जाण्याच्या अडचणी येतात रुग्णांना दवाखान्यात नेण्यासाठी देखील जकरीचे होते या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
चांदोजी म्हात्रे
गावकरी