हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
हिंगोलीत जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची लागण
हिंगोली - आज प्राप्त अहवालानुसार जिल्हाधिकारी यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात उपचार सुरू आहेत. मात्र जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याने जिल्हा कचेरीतील कर्मचाऱ्यामध्ये कार्यालयात जावे किंवा नाही याची धास्ती घेतली आहे.
मागील तीन दिवसापूर्वी जिल्हा परिषदेचे सीईओ यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पस्ट झाल्याने जिल्हा परिषदेमध्ये सानिटाईझ करून तीन दिवस कामकाज बंद ठेवले आहे. या अधिकाऱ्याला कोरोना बाधा झाल्याची घटना ताजी असताना त्यापाठोपाठ कोरोना विषाणूने जिल्हा कचेरीतील बड्या अधिकाऱ्याला देखील सोडले नाही.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग वाढत आहे, त्यामुळे जिल्हा प्रशासनाने वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी गुरुवार पासून१४ दिवसाचा लॉकडाऊन लागू केला आहे. आता तर जिल्हाधिकारी यांनाच कोरोनाची बाधा झाल्याने जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचारी वर्गात खळबळ उडाली आहे.
जिल्हा कचेरीतील कलेक्टर यांचे स्वाब नमुने सोमवारी घेतले होते. त्याचा अहवाल बुधवारी आरोग्य यंत्रणेकडे प्राप्त होताच हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे बुधवारी नेहमीप्रमाणे जिल्हा कचेरीत कर्मचारी हजर झाले. मात्र त्यांना देखील बॉसला कोरोना लागण झाल्याची कुणकुण लागल्याने सर्व विभागातील कर्मचारी कार्यालयात न जाता भीतीने एक वाजे पर्यंत बाहेर मोकळ्या जागेत बसल्याचे दिसून आले. वास्तविक पाहता जिल्हा कचेरीत कोरोना रुग्ण आढळून आल्यास संपूर्ण इमारत सानिटाईझ करणे अपेक्षित होते. मात्र इमारत सानिटाईझ करण्यात आली नाही.हा हलगर्जी पणा कोणाच्या पथ्यावर पडणार काही कळायला मार्ग नाही. विशेष म्हणजे जिल्हा परिषदे प्रमाणे तीन दिवस कार्यालय बंद ठेवून सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन गरजेचे आहे.
सोमवारी जिल्हा कचेरीत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांच्या पत्रकार परिषदेला उपस्थित पत्रकार व अधिकाऱ्यांचे ही स्वाब नमुने घेतल्यास यामध्ये देखील कोरोना पॉझिटिव्ह संख्या आढळून येईल.जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात कोण कोण आले त्यांची यादी तयार करून त्यांचे स्वाब नमुने घेतले जातील असे आरोग्य विभागाच्या सूत्राने सांगितले.