जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 8 दिवसांत झाली दुप्पट
जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 8 दिवसांत झाली दुप्पट
कोरोना रूग्णसंख्या हजाराच्या उंबरठयावर, आतापर्यंत 49 दगावले
परभणी,(प्रतिनिधी): परभणीत करोना साथीचे आकडे चिंता वाढवणारे आहेत. जिल्ह्यात शुक्रवारी 82 नव्या रुग्णांची भर पडली असून आतापर्यंत 49 जणांना करोनामुळे प्राणास मुकावे लागले आहे. एकूणच करोनाची दहशत वाढत चालली असून गेल्या 8 दिवसात रुग्णसंख्या जवळपास दुप्पट झाली आहे.
जिल्हाभरातील करोनाबाधीत रुग्णसंख्येने हजाराचा टप्पा गाठला आहे. त्याचवेळी आतापर्यंत 49 जणांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने नागरिक चिंताग्रस्त बनले आहेत.
परभणी जिल्ह्यातील 82 रुग्णांचे अहवाल काल पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 915 एवढी झाली आहे. त्यापैकी 440 बरे झाले तर 49 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 427 जणांवर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात काल दिवसभरात करोनाचे 82 नवीन रुग्ण जिल्हा रुग्णालयांत दाखल झाले आहेत. या रुग्णांसह जिल्ह्यातील करोनाबाधीत एकूण रुग्णांची संख्या आता 915 इतकी झाली आहे (49 मृत रुग्ण धरून), त्याचवेळी काल आणखी 1 जणाचा करोनामुळे मृत्यू झाला. आजवर मृत पावलेल्या रुग्णांपैकी बहुतेक जणांना दीर्घकालीन आजार होते तर काहीजण वयोवृद्ध होते.
अन्य आकडेवारीवर नजर मारल्यास काल करोना सदृष्य लक्षणे असलेले अनेक नवीन रुग्ण आढळले आहेत.
करोनाबाधितांच्या मृत्यूचा अहवाल पाहिल्यास 50 टक्के मृत व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार व अन्य दीर्घकालीन आजार होते असे स्पष्ट झाले आहे. शिवाय ते टक्के मृतांच्या बाबतीत वार्धक्य हे कारण आढळले आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित आजार असलेल्या व्यक्तींनी तसेच वृद्धांनी घरातच राहणे अत्यावश्यक असल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे. ताप, खोकला, घसा खवखवणे तसेच श्वास घेण्यास त्रास होत असल्यास जराही वेळ न दवडता जवळच्या करोना आरोग्य केंद्रात उपचारासाठी यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.
असे वाढत गेले
कोरोना रुग्णांचे आकडे
जिल्ह्यात 31 जुलै रोजीपर्यंत 622 बाधित, 30 मृत्यू तर 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले. 1 ऑगस्टला हाच आकडा अनुक्रमे 676, 33, 392, 2 ऑगस्टला 693, 33, 392, 3 तारखेला 720, 40, 395 इतका वाढला होता. 4 ऑगस्टला पुन्हा मोठ्या संख्येने रुग्ण आढळले. त्यामुळे बाधित 737, मृत्यू 42, कोरोनामुक्त 399 अशी संख्या झाली. 5 ऑगस्टला बधितांची संख्या वाढून 779 वर गेली तर मृतांचा एकूण आकडा 43 वर पोहोचला व 405 जण कोरोनामुक्त झाले. 6 ऑगस्टला 818 बाधित, 48 मृत्यू तर 411 जण आजारातून बरे झाले. 7 ऑगस्ट रोजी आतापर्यंतचा रुग्ण संख्येचा उच्चांक होऊन बाधित 82 ने वाढले. आतापर्यंत 49 कोरोनाचे बळी ठरले आहेत.