हिंगोलीत रिपब्लिकन सेनेचे पालिकेवर चिखलफेक आंदोलन
हिंगोलीत रिपब्लिकन सेनेचे पालिकेवर चिखलफेक आंदोलन
पोलिसांनी आंदोलन कर्त्यांना ताब्यात घेतले
हिंगोली - शहरातील बौद्ध वस्त्यातील रस्त्यांची कामे सुरू करावी,यासाठी रिपब्लिकन सेनेच्या वतीने सोमवारी (ता.२४) हिंगोली पालिकेचे लक्ष वेधण्यासाठी मोर्चा काढून चिखलफेक आंदोलन सुरु केले असता, पोलिसांनी आंदोलन कर्त्याना ताब्यात घेत नंतर सोडून दिले.यावेळी पुरुषासह महिलाही सहभागी झाले होते.
रिपब्लिक सेनेचे जिल्हा अध्यक्ष किरण घोंगडे यांच्या अध्यक्षतेखाली विविध मागण्यासाठी पालिकेवर मोर्चा काढून चिखलफेक आंदोलन करण्यात आले.यावेळी पालिका प्रशासनावर जोरदार हल्ला चढविताना म्हणाले की,
शहरातील शाहूनगर, सम्राटनगर ,आंबेडकरनगर,कमला नगर, सिद्धार्थनगर,बावनखोली,आदी भागात मागील १५ ते २५ वर्षा पासून नागरिकांनी प्लॉट खरेदी करीत घरे बांधली,परंतु पालिका प्रशासन हेतूपरस्पर बौद्ध वस्त्यात लक्ष देत नसल्याने या भागातील नागरिकांना पावसाळ्यात येजा करण्यासाठी चिखल तुडवीत मुख्य रस्ता गाठण्याची वेळ आली आहे.याकडे मात्र ना लोक प्रतिनिधी, ना पालिका प्रशासनाने आजपर्यंत केवळ शहरातील मुख्य रस्ते सोडले तर आजही अनेक वस्त्यात कुठलेच रस्ते तयार केले नसल्याचा आरोप रिपब्लिक सेनेने केला आहे.त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे.
यावेळी जिल्हा नेते राहुल पुंडगे, युवा जिल्हाप्रमुख विकि काशिदे, शहराध्यक्ष योगेश धबाले, विनोद जोगदंड, रमेश कांबळे, अमित कुर्हे यांच्यासह शेकडो पुरुषासह महिलांची सुद्धा आंदोलनात सहभागी झाले होते.दोन दिवसांपूर्वी किरण घोंगडे यांनी शहरातील बौद्ध वस्त्यात रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याचे पाहणी केली असता त्यांनी चिखलफेक आंदोलन करण्याचा निर्णय घेतला नागरिकांनी आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले असता सगळ्या नगरातून प्रतिसाद मिळत गेला आहे.त्यामुळे सोमवारी पालिकेवर मोर्चा काढून चिखल फेक आंदोलन करताना पोलिसांनी सर्वांना शहर पोलीस ठाण्यात नेऊन नंतर काही वेळाने त्यांची सुटका केली. मात्र या चिखलफेक आंदोलनाचा धसका पालिकेच्या अधिकारी,पदाधिकारी ,नगरसेवकांनी चांगलाच घेतल्याची चर्चा पालिकेच्या वर्तुळात ऐकावयास मिळत होती.