ईगल व ऍग्रोटेक कंपन्यांवर गुन्हा दाखल 

ईगल व ऍग्रोटेक कंपन्यांवर गुन्हा दाखल 


शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे प्रकरण भोवले


 सेनगाव  - तालुक्यातील शेतकऱ्यांना जास्त उगवण क्षमता आणि जास्त उत्पादन देणारे बियाणे असल्याचे भासवून त्यांना विक्री करण्यात आलेल्या बियाण्यांची उगवनच झाली नसल्याने सेनगाव येथील कृषी विस्तार अधिकारी प्रताप गाडे यांच्या फिर्यादीवरून ईगल व अग्रोटेक लिमिटेड, इंदोर या दोन कंपन्यां विरुद्ध शेतकऱ्यांची फसवणूक आणि विश्वासघात केल्याबद्दल शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
 
या प्रकरणी सेनगाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभाग, सेनगाव यांच्याकडे तक्रारी दिल्या होत्या. पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही, काहींची उगवण क्षमता कमी, काही उगवलेले बियाणे उगवताच जळून जाणे असले प्रकार घडले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा पेरणी करावी लागली. तर दुसऱ्या पेरणीत सुद्धा अनेक शेतकऱ्यांना बियाणे न उगवण्याचा फटका बसला आहे. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा या वर्षीचा खरीप हंगाम हातातून गेला आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान झालेल्या आणि प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याबाबत तक्रार केली होती.


तर कृषी विभागाकडून या तक्रारींची गंभीर दखल घेत अखेर  कृषी विभागाच्या वतीने हे बियाणे परभणी येथील कृषी विद्यापीठात तपासणीसाठी पाठविण्यात आले. परभणी येथील कृषी विद्यापीठाने दिलेल्या तपासणी अहवालाच्या आधारे ईगल व अग्रो बायोटेक लिमिटेड, इंदोर या दोन बीज उत्पादक कंपन्या विरुद्ध  सेनगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कृषी विस्तार अधिकारी प्रताप गाडे यांनी सांगितले, की या कृषी कंपन्यांनी सेनगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. यामध्ये शेतकऱ्यांना ५० हजार ते २ लाख रुपयांपर्यंत नुकसान होईल एवढा फटका बसला आहे.


याशिवाय शेतकरी मानसिक तणावाखाली असल्यामुळे कृषी विभागाने स्वतःहून या प्रकारांची दखल घेतली आहे. या दोन्ही कंपन्यांचे एजंट राजाराम बाबर यांच्यावर सुद्धा शेतकऱ्यांची दिशाभूल करणे, फसवणूक करणे, आर्थिक नुकसानीस कारणीभूत ठरले असल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. कृषी बीज उत्पादन कंपन्यांविरुद्ध दाखल झालेला हा पहिलाच गुन्हा असून गुन्हा दाखल झाल्यामुळे कृषी बीज उत्पादन कंपन्यांमध्ये खळबळ उडाली आहे. हा गुन्हा दाखल झाल्यामुळे आता हिंगोली जिल्ह्यातील इतर ४ तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे जिल्हाभरात बीज उत्पादन उत्पादक कंपन्यां विरुद्ध गुन्हे दाखल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गुन्हे दाखल झाल्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याचा मार्ग सुद्धा मोकळा झाला आहे.शुक्रवारी अंकुर सिडस कंपनीवर गुन्हा दाखल झाला होता. आता दोन कृषी उतापदन करणाऱ्या कंपन्यांवर गुन्हे दाखल झाल्याने अन्य कंपन्यांचे एजंट जिल्ह्यातून काढता पाय घेतला आहे.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा