पेडगाव १४ दिवसासाठी रेड झोन घोषित
पेडगाव १४ दिवसासाठी रेड झोन घोषित
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी काढले आदेश
हिंगोली - तालुक्यातील पेडगाव येथे दोन दिवसांपूर्वी मुंबईवरून परतलेला एक कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आल्याने त्याचा संसर्ग गावात व परिसरात फैलावू नये म्हणून जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पेडगाव येथील सर्व सीमा गुरुवारी बंद करण्याचे आदेश काढले असून १४ दिवसासाठी हा परिसर रेड झोन घोषित केला असल्याने गावातील नागरिकांना बाहेर येता येणार नाही तर बाहेरील नागरिकांना या काळात प्रवेश करता येणार नाही.
दरम्यान, बुधवारी जिल्ह्यात एकाच दिवशी १४कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. अधिक नागरिक हे पुणे, मुंबई, औरंगाबाद या हॉटस्पॉट झोन मधून गावी परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्याचा रिकव्हरी रेट कमी असतानाही बाहेरून येणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे वाढत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार, जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. शिवाजी पवार, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे , अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे,तलाठी अयुब पठाण आदींनी पेडगाव येथे भेट देऊन सीमा सील केल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी पेडगाव येथे कोरोना बाधित रुग्ण आढळून आला असल्याने तेथील सर्व सीमा गुरुवारी शील करून हा परिसर१४ दिवसासाठी रेड झोन म्हणून घोषित केला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात कोणी आले का याची चाचपणी एसडिएम अतुल चोरमारे, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, ग्रामसेवक, तलाठी अयुब, आरोग्य कर्मचारी यांनी केली. या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणे मार्फत येथील नागरिकांची आरोग्य तपासणी, स्वाब नमुने घेतले जाणार आहेत.