हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालय शील
हिंगोली येथील सहाय्यक धर्मादाय कार्यालय शील
अपडाऊन कर्मचारी पॉझिटिव्ह निघाल्याने इतर दहा कर्मचारी विलगीकरण कक्षात
हिंगोली - येथील सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयातील एका अप डाऊन करणाऱ्या कर्मचाऱ्याला परभणी येथे कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल जिल्हा समान्य रुग्णालयाकडे प्राप्त होताच शुक्रवारी धर्मदाय आयुक्त कार्यालय शील करून येथील दहा कर्मचाऱ्यांना अंधारवाडी येथील मुलांचे वसतिगृहात विलगीकरण कक्षात दाखल केल्याची माहिती डॉ. जाफर यांनी दिली.
येथील सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये बारा कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये काही कर्मचारी परभणी येथून ये -जा करतात. चार ते पाच दिवसापूर्वीच परभणी येथून ये-जा करणाऱ्या एका कर्मचाऱ्याचे वडिल परभणी येथे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने परभणीच्या आरोग्य विभागाने त्यांच्या कुटुंबातील सर्वच व्यक्तींचे स्वॅब नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्याचा अहवाल परभणीच्या शासकीय रुग्णालयाला प्राप्त झाला. यामध्ये हिंगोली येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात कार्यरत असलेला कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. याबाबतची माहिती हिंगोलीच्या आरोग्य विभागाला मिळाल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किशोर श्रीवास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.गोपाळ कदम, वैद्यकीय अधिकारी डॉ. जफर यांच्यासह आरोग्य विभागाच्या पथकाने तातडीने सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालय गाठून याबाबतची माहिती कार्यालयाला दिली. त्यानंतर कार्यालय निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच कार्यालयातील दहा कर्मचारी अंधारवाडी येथील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. त्या सर्वांचे स्वॅब नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या सूत्रांनी सांगितले. त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या कर्मचाऱ्यांची विलगीकरण कक्षातून तीन दिवसानंतर सुटका केली जाणार आहे.