हिंगोली, ...बाळ तू लवकरच कोरोनामुक्त होणार .! जिल्हाधिकारी जयवंशी
...बाळ तू लवकरच कोरोनामुक्त होणार .!
जिल्हाधिकारी जयवंशी यांनी साधला पाच वर्षांच्या मुलीशी संवाद
सेनगाव - शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शुक्रवारी शहरातील कोरोना सेंटरला भेट देत चक्क पाच वर्षीय कोरोना बाधित बालिकेशी संवाद साधून त्या बालिकेला धिर देत बाळ तू लवकरच कोरोना मुक्त होणार असा आत्मविश्वास त्यांनी त्या चिमुकिलीला दिला .
सेनगाव शहरात कोरोना संसर्गजन्य आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता तालुका प्रशासनासह स्थानिक नगर प्रशासन व आरोग्य विभागाकडून दक्षता घेत असून आज अचानक जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी शहरात तहसील कार्यालयाला भेट देत तालुक्यातील महसूल वसुली उद्दिष्टे आढावा घेतला व संबंधित अधिकारी कर्मचारी यांना महसुली संदर्भात महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी जयवंशी यांनी शहरात कोरोना बाधित रुग्णांसाठी ताब्यात घेतलेले तोष्णीवाल महाविद्यालयातील ए.आर.टी.एम. इंग्लिश स्कूल येथील कोरोला सेंटरला भेट देत तेथील तालुका प्रशासनाकडून राबवित असलेल्या बाबीची तपासणी केली.
खुद्द जिल्हाधिकारी जयवंशी यांनी स्वच्छालय व स्नानगृह यांची पाहणी केली कोरोना सेंटरला तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरा लावून त्यांचे व्हिडिओ चित्र हे मोबाईल वरती प्रदर्शित झाले पाहिजेत ,यासह कोरोना बाधित रुग्णांसाठी स्वच्छ पाणी व चांगल्या दर्जाचे जेवण देण्याच्या सूचना तालुका प्रशासनाला देण्यात आल्या. यावेळी कोरोना सेंटरमध्ये शहरातील मुंबई वरून प्रवास केलेली पाच वर्षीय कोरोना बाधित मुलगी उपचार घेत होती .दरम्यान जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी या पाच वर्षीय कोरोना बाधित बालीकेसी संवाद साधून काही अडचण असल्यास मला सांगा व बाळ तू लवकरच या आजारापासून बरे होणार आहे. चिंता करू नको, असा ध्येयवादी धीर देत त्या बालिकेच्या पाठीवर प्रेमाने हात फिरविल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .
यावेळी जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या कोरोना सेंटर भेटीदरम्यान तहसीलदार जीवक कुमार कांबळे, मुख्याधिकारी शैलेश फडसे, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, नायब तहसीलदार वीरकुवर अण्णा, यांची उपस्थिती होती. या भेटी दरम्यान जिल्हाधिकारी यांनी तालुका प्रशासन व स्थानिक नगर प्रशासन तसेच आरोग्य प्रशासन यांना कोरोना संसर्गजन्य आजारात संबंधी घेत असलेली दक्षता व त्यावर करत असलेली उपायोजना यांची पाहणी करत जिल्हाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले.