एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण
एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरला कोरोनाची लागण
जिल्हा परिषद सील ,चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने तपासणी साठी पाठविणार
हिंगोली - येथील जिल्हा परिषदेच्या एनआरएचएम विभागातील एका डॉक्टरलाच कोरोनाची लागण झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. संपूर्ण जिल्हा परिषदेच्या इमारतीतील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून,आरोग्य विभागातील जवळ पास चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेकडे पाठविणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर हा कोरोना बाधीत रुग्णांची सेवा करताना संसर्ग झाला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तर त्या डॉक्टरला ताप, खोकला येत असल्याने तो सोमवार पासून आजारी असल्याने जिल्हा परिषदेकडे आला नाही. आज त्या डॉक्टरला समान्य रुग्णालय येथील
आयसोलेशन वॉर्डात उपचार सूरू आहेत.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरचा आरोग्य विभागात वावर झाल्याने संपूर्ण आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांची यादी तयार करून जवळ पास चाळीस कर्मचाऱ्यांचे स्वाब नमुने घेऊन प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविण्यात येणार असून या सर्वांना क्वारंटाइन केले जाणार आहे. तसेच त्या डॉक्टरांच्या संपर्कात कोणकोण व्यक्ती आले त्यांचीही यादी करून त्यांचेही नमुने घेतले जातील असे डॉ. पवार यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेमध्ये कोरोना रुग्ण आढळून आल्याने एकच खळबळ उडाली असून सर्व विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना बाहेर काढण्यात आले असून जिल्हा परिषदेच्या इमारतीला शील केले आहे.त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये सर्व अधिकारी, कर्मचारी काम सोडून धावपळ करीत असल्याचे चित्र होते.तर जिल्हा परिषद खाली केल्यामुळे अधिकारी, पदाधिकारी यानी तातडीने काढता पाय घेतला. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शुकशुकाट पाहवयास मिळत होता.