हिंगोली : अंकुर सिडच्या व्यवस्थापकासह एकावर गुन्हा दाखल
अंकुर सिडच्या व्यवस्थापकासह एकावर गुन्हा दाखल
सेनगाव- सोयाबीनची उगवण क्षमता कमी असताना देखील उगवण क्षमता अधिक असल्याचे सांगून शेतकऱ्यांची फसवणूक करून निकृष्ट दर्जाचे बियाणे वितरण केल्या प्रकरणी नागपूर येथील अंकुर सिड्सच्या व्यवस्थापकासह एकावर सेनगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खरीप हंगामात शेतकऱ्यांना पेरणीची घाई असते. आशा वेळी बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्या जिल्ह्यात अवतरतात आणि शेतकऱ्यांना आपली बियाणे चांगली असून अधिक उगवण शक्ती असल्याच्या थापा मारतात यात शेतकरी बळी पडतो. अशाच एका नागपूर येथील मे अंकुर सिडस प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक व रविंद्र बोरकर यांनी सेनगाव पंचायत समिती आवारात ता.३०जून रोजी येऊन आमच्या कंपनीचे सोयाबीन उगवण क्षमता कमी असतानाही उगवण क्षमता जास्त असल्याचे दाखवून निकृष्ट दर्जाचे बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून पोबारा झाले. इकडे शेतकऱ्यांनी खरीप हंगामात अंकुर सोयाबीनचे सिडसची पेरणी करून देखील बियाणे आजपर्यंत उगवले नसल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय गाठून आपली अंकुर सिडस कंपनीने फसवणूक केल्याची कैफियत मांडली. त्यानंतर तालुका अधिकारी यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्या पेरलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी केली असता बियाणे उगवल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे तालुका कृषी अधिकारी संदीप वळकुंडे यांच्या फिर्यादी वरून सेनगाव पोलीस ठाण्यातबियाणे कायदा प्रमाणेअंकुर सिडस व्यवस्थापक व रविंद्र बोरकर या दोघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जिल्ह्यात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपनी विरुद्ध हा पहिलाच गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीला अटक केली नसून पुढील तपास पोलीस करीत आहेत.