धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी पुन्हा बारा रुग्णाची भर
धक्कादायक ; हिंगोलीत एकाच दिवशी पुन्हा बारा रुग्णाची भर तर आठ रुग्ण कोरोनामुक्त
रुग्ण संख्येचा आलेख वाढतोय, हाफ सेंच्युरीकडे वाटचाल
हिंगोली - शुक्रवारी रात्री अकरा वाजता प्राप्त अहवालानुसार हिंगोली येथील दोन, कळमनुरी पाच, वसमत चार, तर सेनगाव येथील एका तरुणाला कोरोना लागण झाल्याचे स्पस्ट झाले असून शुक्रवारी अचानक बारा रुग्ण वाढल्याने रुग्ण संख्येचा आलेख कमी होण्या ऐवजी वाढत असून पुन्हा कोरोना बाधितांची संख्या अर्ध शतकाकडे वाटचाल करीत असल्याचे अहवालावरील आकडेवारीवरून दिसून येते.तर आठ रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत.त्यामुळे जिल्हा प्रशासनाची पुन्हा चिंतेत भर पडली आहे.
दरम्यान, जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डातील भरती असलेल्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये३३ वर्षीय महिला व११ वर्षाचा तिच्या मुलाचा समावेश आहे. हे दोघेही( ता.२९) जून रोजी हैद्राबाद येथून नातेवाईकाला भेटण्यासाठी हिंगोली येथे आले होते. त्यांना सर्दी, ताप, खोकला असल्याने (ता.१)जुलैला सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले.
तसेच कळमनुरी येथील कोरोना केअर सेंटर येथे पाच व्यक्तीं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आज प्राप्त अहवालावरून स्पस्ट झाले. यातील दोन रुग्ण ४५ वर्षीय पुरुष व दहा वर्षाची मुलगी विकास नगर येथील रहिवासी असून औरंगाबाद येथून गावी परतले आहेत. इतर तिघे जण तालुक्यातील चिखली येथील रहिवासी असून मुंबई वरून परतले आहेत.
याशिवाय वसमत कोविड हेल्थ सेंटर अंतर्गत चार व्यक्तींना नव्याने लागण झाल्याचे स्पस्ट झाले आहे. हे चौघे जण बहिर्जी नगर येथील कोरोना व्यक्तीच्या जवळील संपर्कातील आहेत. यामध्ये ७१ वर्षीय पुरुष,६० वर्षीय महिला व ३४ वर्षीय महिला आणि१४ वर्षाच्या मुलीचा समावेश आहे. तर सेनगाव येथील क्वारंटाइन सेंटर येथे एका२५ वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून तो केंद्रा बु. येथील आहे.
दरम्यान, कळमनुरी येथे क्वारंटाईन केलेले सात रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली. यामध्ये कवडा पाच, गुंडलवाडी दोन, यांचा समावेश आहे. तर वसमत येथील क्वारंटाइन असलेला एक रुग्ण बरा झाला आहे. आजघडीला एकाच दिवशी बारा रुग्णांना कोरोनाची लागण झाली तर आठ रुग्ण बरे झाले झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली.
वसमत येथे सहा, कळमनुरी केअर सेंटर येथे अकरा पुन्हा कळमनुरी कोविड सेंटर येथे दोन अश्या एकूण १९ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर लिंबाळा अंतर्गत कोअर सेंटर येथे दहा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा दोन, रिसाला दोन, केंद्रा बु. दोन, प्रगतीनगर एक, भांडेगाव दोन, पिंपळ खुटा एक यांचा समावेश आहे. तसेच सेनगाव येथे सहा रुग्णावर उपचार सुरु आहेत. यात मन्नास पिंपरी एक, ताक तोडा एक, केंद्रा बु. दोन, लिंग पिंपरी दोन यांचा समावेश आहे. तर औंढा येथे चार रुग्णावर उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यात एकूण ४९९२ व्यक्तींना भरती करण्यात आले असून, त्यापैकी ४४४७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.४३०० रुग्णांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला६८४ रुग्णावर उपचार सुरु असून२९३ रुग्णांचे थ्रोट नमुने येणे बाकी असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.