कळमनुरी, सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
सहाय्यक लेखाधिकारी एसीबीच्या जाळ्यात
कळमनुरी - स्वच्छ भारत मिशन अंतर्गत झालेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाची अग्रीम रक्कम काढण्यासाठी सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणाऱ्या येथील पंचायत समितीचा सहाय्यक लेखाधिकारी डी.एस. शिंदे यांना मंगळवारी लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी लाच स्वीकारताना अटक केली.
याबाबत लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कळमनुरी येथील पंचायत समिती मध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक लेखाधिकारी डी. एस. शिंदे यांनी तालुक्यातील एका ग्रामपंचायत अंतर्गत बांधकाम करण्यात आलेल्या स्वच्छ भारत मिशन योजनेमधील स्वच्छतागृहाच्या बांधकामाची शिल्लक राहिलेली अग्रीम रक्कम काढून देण्याकरिता संबंधितांकडे सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.
संबंधीत नागरिकाने याप्रकरणी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केल्यानंतर लाचलुचपत विभागाच्या नांदेड येथील अधीक्षक कल्पना बारावकर, ॲडिशनल अधीक्षक अर्चना पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलीस उपअधिक्षक हनुमंत गायकवाड,, पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, ममता अफुने, कर्मचारी ए. एस. कीर्तनकार, पी. एस. थोरात, हिम्मतराव सरनाईक, ज्ञानेश्वर पंचलिंगे, संतोष दुमाने, रुद्रा कबाडे, तानाजी मुंडे, यांनी मंगळवारी पंचायत समिती परिसरात सापळा लावला यावेळी तक्रारदारा कडून सहाय्यक लेखाधिकारी श्री. शिंदे यांनी लाच स्वीकारतात पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले.याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत विभागाचे जिल्हा पोलिस उप अधिक्षक गायकवाड यांनी दिली आहे.