शहरात पाच दिवसाच्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी
शहरात पाच दिवसाच्या संचार बंदीची कडक अंमलबजावणी
शहरालगत असलेल्या गावाना संचारबंदीचा फटका
हिंगोली - शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पाच दिवसाची संचारबंदी लावण्यात आली असून सोमवारी (ता. ६) पहिल्या दिवशी कडक अंमलबजावणी सुरू झाली आहे. जागोजागी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शहरालगत असलेली गावाना देखील फटका बसला आहे.
हिंगोलीतील तलाब कट्टा, गांधी चौक, रिसाला बाजार, या भागात कोरोनाचे रूग्ण आढळून आल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हिंगोली नगरपरिषदेच्या हद्दीत रविवारी सायंकाळी सात पासून ते शुक्रवार( ता. १०) या कालावधीत बंदी करण्यात आली आहे. शहराच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत.
सदर सीमेतून कोणतेही वाहन अथवा व्यक्ती आत किंवा बाहेर जाण्यास प्रतिबंधीत केले आहे. या कालावधीत शहरातील राष्ट्रीय बँका केवळ शासकीय कामासाठी तसेच ग्रामीण भागात बँकेची रोकड घेऊन जाण्यासाठी सुरू होत्या.
दरम्यान, स़ंचारबंदीची कडक अंमलबजावणी शहरात सकाळपासून सुरु झाली आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरातील गांधी चौक, नांदेड नाका, छत्रपती शिवाजी महाराज चौक, खटकाळी बायपास, अकोला बायपास आदी ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिवाय बळसोंड , गंगानागर, मालवाडी भागातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती.
शहरात पाच दिवसाच्या संचारबंदीत अत्यावश्यक सेवा वगळता सर्व बाजारपेठ बंद होती. जर विनाकारण
शहरात फेरफटका मारणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई केली जाणार असल्याचा इशारा जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिला आहे. संचार बंदीच्या पहिल्याच दिवशी शहरातील सर्व दुकाने बंद आढळून आल्याने रस्त्यावर तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे रस्त्यावर पोलीसा शिवाय दुसरे कोणीही आढळून आले नाही.
शहरी भागात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस संचार बंदीचे आदेश रविवारी काढले आहेत.शहरात रिसाला बाजार, गाडीपुरा परिसरात दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे हा भाग कन्टेन्टमेन्ट झोन घोषित केला आहे.
शहरातील कोरोना रुग्णाचे प्रमाण कमी करण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश
जयवंशी ,पोलीस अधीक्षक योगेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पालिकेचे सिओ रामदास पाटील, पोलीस निरीक्षक शेख सय्यद आदी कडून शहरातील गांधी चौक, इंदिरा गांधी चौक, जवाहर रोड, शिवाजी चौक, नांदेड नाका, रिसाला बाजार आदी मुख्य ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
संचारबंदी काळात शासकीय कार्यालय, बँक, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व आस्थापना बंद होत्या. जे नागरिक विनाकारण फिरताना आढळून आल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून सोडून देत होते. मात्र एकंदरीत पहिल्याच दिवशी बाजारपेठ पूर्णतः बंद होती. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट पाहवयास मिळत होता. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, सीओ रामदास पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतला.