लॉकडाऊन संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही जिल्हाधिकारी
हिंगोली - लॉकडाऊन संदर्भात अद्याप कुठलाही निर्णय नाही
जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी
हिंगोली - दोन दिवसांपूर्वी जिल्हा व्यापारी महासंघाने हिंगोली शहरात वाढते रुग्ण पाहता दहा दिवस संचारबंदी लागू करावी अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निवेदनाद्वारे केली होती. परंतू अद्याप या मागणीवर कुठलाही निर्णय झाला नसल्याचा निर्वाळा देत लॉकडाऊन संदर्भात निर्णय झाल्यास दोन ते तिन दिवस अगोदर नोटीस काढून काळविले जाईल असे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी सोमवारी 'मराठवाडा केसरी' शी बोलतांना सांगितले.
जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकारी श्री. जयवंशी यांनी बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या किंवा बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी वैद्यकीय कारणास्तव ईपास परवाना बंधनकारक केला आहे. तसेच बाहेरील नागरिकांना आत मध्ये प्रवेश देऊ नये यासाठी ठिकठिकाणी चेक पोस्ट उभे केले आहेत. त्यानुसार सोमवारी अचानक जिल्हाधिकारी श्री. रुचेश जयवंशी यांनी परभणीकडे जाणाऱ्या मार्गावरील हट्टा , तसेच नांदेडकडे जाणाऱ्या चेक पोस्टला भेटी दिल्या. अचानक जिल्हाधिकारी यांनी भेटी दिल्याने कर्त्तव्यावर असलेले अधिकारी, कर्मचारी गोंधळून गेले होते. यावेळी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून उपस्थित कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या.तसेच विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्याचे आदेश दिले. याशिवाय विनाकारण व्यक्ती फिरताना आढळून आल्यास त्यास क्वारंटाइन करण्याच्या सूचनाही दिल्या.
त्यानंतर जिल्हाधिकारी श्री. रुचेश
जयवंशी यांनी थेट वसमत येथील कोरोना केअर सेन्टरला भेट देऊन पाहणी केली असता, स्वछता व साफसफाई नसल्याचे दिसून आल्याने जिल्हाधिकारी श्री. जयवंशी चांगलेच संतापले होते.त्यानंतर स्वछता ठेवण्या संदर्भात उपस्थित अधिकाऱ्यांना तंबी दिली. यानंतर मला पुढे घाण दिसून आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. याचबरोबर स्वछतेसाठी आणखी दोन व्यक्ती वाढवून घेऊन कोरोना सेंटर मध्ये स्वछता ठेवण्याचे आदेश दिले.
ते बोलताना पुढे म्हणाले,लॉकडाऊन संदर्भात व्यापारी महासंघाने दोन दिवसांपूर्वी निवेदन दिले होते. शहरात कोरोना रुग्ण संख्या वाढत असून दहा दिवस संचारबंदी लागू करावी असे म्हटले आहे. परंतू याबाबत अद्याप व्यापारी महासंघाच्या मागणीवर कोणताही निर्णय झालेला नाही. नागरिकांनी सामाजिक अंतर ठेवत मास्कचा वापर करावा असे आवाहन केले. लॉकडाऊन संदर्भात निर्णय झाल्यास दोन ते तिन दिवस अगोदर जिल्हा प्रशासनाच्या वतीने नोटीस काढून कळविले जाईल असे शेवटी श्री. जयवंशी यांनी सांगितले. त्यामुळे सध्या तरी शहरातील लॉकडाऊन संदर्भातील नागरिकांच्या तर्क वितर्कांना जिल्हाधिकारी जयवंशी यांनी पूर्ण विराम दिला आहे.