हिंगोली : जीपत तिनही विषय सभापतींच्या निवडी बिनविरोध,
जीपत तिनही विषय सभापतींच्या निवडी बिनविरोध
शिक्षण रत्नमाला चव्हाण तर कृषी व पशुसंवर्धन बाजीराव जुमडे ,आरोग्य, बांधकाम मनीष आखरे यांची वर्णी
हिंगोली - जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदेची शुक्रवारी( ता.३)तहकूब विशेष सर्व साधारण सभा पार पडली. या सभेत विषय सभापती पदाच्या निवड प्रक्रिया बिनविरोध पार पडली शिक्षण सभापती पदी रत्नमाला चव्हाण तर कृषी व पशु संवर्धन सभापती पदी बाजीराव जुमडे यांची आरोग्य, बांधकाम मनीष आखरे यांची बिनविरोध निवड प्रक्रिया झाली.
येथील जिल्हा परिषदेच्या षट्कोनी सभागृहात शुक्रवारी(ता.३) जिल्हा परिषदेची तहकूब झालेली विशेष सर्व साधारण सभा जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली.यावेळी व्यास पिठावर उपाध्यक्ष मनीष आखरे, सीईओ राधाबीनोद शर्मा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी आदींची उपस्थिती होती.
फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेली सभा कोरम अभावी तहकूब करण्यात आली होती. त्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढल्याने जिल्ह्यात लॉकडाऊन ,संचारबंदी लागू करण्यात आली.त्यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर शुक्रवारी सामाजिक अंतर पाळत, सानिटायझर, थर्मलगनच्या साह्याने अधिकारी, पदाधिकारी, सदस्य यांची तपासणी करून सभागृहात सर्वांना सोडण्यात आले.त्यानंतर बरोबर एक वाजता सभेला सुरुवात झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी यांनी विषय पत्रिकेवरील विषयांचे वाचन केले. तसेच पदाधिकाऱ्यांनी दिलेले ठरावाचे वाचन करून नवीन विषय सभापती पदांचे नावे जाहीर केली. यावेळी शिक्षण सभापती पदी राष्ट्रवादीच्या रत्नमाला चव्हाण यांची तर कृषी व पशु संवर्धन सभापती पदी काँग्रेसचे बाजीराव जुमडे ,तसेच मनीष आखरे यांच्याकडे आरोग्य व बांधकाम खाते वाटप झाल्याने यांच्या नावावर एकमताने शिक्का मोर्तब करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या अडीच वर्षाचा कार्यकाळ संपल्याने जानेवारी महिन्यात निवड प्रक्रिया पार पडली. त्यानंतर फेब्रुवारी महिन्यात विशेष सभेत विषय समित्या व सभापती खाते वाटप होणे अपेक्षित होते. मात्र जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले यांनी कोरम अभावी ही सभा तहकूब केल्याने सभापती पदाच्या निवडी बारगळल्या होत्या. त्यानंतर मात्र कोरोना प्रादुर्भाव वाढल्याने त्यास रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून विविध उपाय योजना केल्या जात होत्या. गर्दी टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बैठका, सभा, घेण्यास बंदी घातल्याने या निवडी लांबणीवर पडल्या होत्या. त्यानंतर शासनाने लॉकडाऊन मध्ये शिथिलता दिल्याने जिल्हाधिकारी जयवंशी यांनीसामाजिक अंतर पाळत सभा, बैठका घेण्यास परवानगी दिली. त्यामुळे तब्बल पाच महिन्यानंतर जिल्हा परिषदेची विशेष सर्व साधारण सभा पार पडली. एरवी आठ तास चालणारी सभा लॉकडाऊन काळात केवळ अर्ध्या तासात बिनविरोध सभापतीच्या निवडी जाहीर करीत गुंडाळली. मात्र विषय समितीच्या अठरा जागेसाठी अद्याप निर्णय घेतला गेला नाही.कुठलाही गोंधळ न होता शांततेत निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी सभागृहात सर्वच्या सर्व ५२ सदस्यांची उपस्थिती होती.सभापती पदाच्या निवडी होताच शिक्षण सभापती रत्नमाला चव्हाण यांनी पदभार स्वीकारला असता त्यांचा अधिकारी, पदाधिकारी ,कर्मचारी,पक्षा च्या कार्यकर्त्यांनी दालनात शुभेच्छा देण्यासाठी एकच गर्दी केली होती.तसेच बाजीराव जुमडे यांनी ही कृषी व पशु सभापती पदाचा पदभार घेताच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी सत्कार केला.
चौकटीचा मजकूर
---------------------
सभागृह आकर्षक फुलांनी सजवले
---------------------------
आज विशेष सर्व साधारण सभा असल्याने काल पासूनच सभागृहात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सानिटायझर ,निर्जंतुकीकरण करून सभागृहातील व्यासपीठ आकर्षक फुलांनी सजविले होते. तसेच दोन सदस्यांमध्ये एक झाडाची कुंडी ठेवत शोषल डिस्टन्स पाळण्यात आला, विशेष म्हणजे सर्वांनी मास्क तोंडाला बांधल्याचे दिसून आले.