सेनगावच्या विवाहितेचा विष प्राशनानंतर परभणीत मृत्यू
सेनगावच्या विवाहितेचा विष प्राशनानंतर परभणीत मृत्यू
जाचास कंटाळून संपविले, सासरच्या मंडळींवर गुन्हा
परभणी , दि.21 (प्रतिनिधी)-
मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून तसेच हुंडयातील 3 लाख़ रुपयांच्या रक्कमेच्या मागणीसाठी सासरच्या मंडळीकडून होत असलेल्या छळास कंटाळून सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा येथील विवाहितेने विषारी औषध पिले. परभणीत उपचारा दरम्यान या विवाहितेचा मृत्यू झाला. याप्रकरणी तिच्या वडिलांच्या फिर्यादीवरून येथे दाखल झालेला गुन्हा सेनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.
धर्मापुरी(ता.परभणी) येथील दुर्गा गाडगे हिचा विवाह चिंचखेडा येथील ज्ञानेश्वर गाडगे याच्याशी 2015 मध्ये झाला होता. विवाहानंतर सासरच्या मंडळींनी माहेरावरून पैसे आणण्याच्या मागणीसाठी छळ सुरू केला होता. मुलबाळ होत नसल्याचे कारण समोर करीत सासरची मंडळी तिला वारंवार मारहाण करणे, उपाशीपोटी ठेवणे आदी प्रकार करीत होती, असे तिचे वडील रामा बापूराव गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तिचा पती ज्ञानेश्वर गाडगे, सासू सत्यभामा गाडगे, सासरा दादाराव गाडगे, दीर गणेश गाडगे ही मंडळी या कारणांसाठी तिचा छळ करीत असल्याचे दुर्गाने वेळावेळी माहेरी आल्यानंतर आपल्यासह आईला ही बाब सांगितली होती. परंतू परिस्थिती हलाखीची असल्यामुळे तिच्या सासरच्या मंडळींची अपेक्षा पूर्ण करू शकत नव्हतो. त्यातूनच वाढत जाणा-या या छळास कंटाळून दुर्गाने दि.17 जून रोजी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तिला तातडीने जिंतूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतू प्रकृती अस्वस्थामुळे दुर्गाला परभणी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. उपचारा दरम्यान दि.18 रोजी तिचा मृत्यू झाला. याबाबत वडील रामा गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती, सासू, सासरा, दीर या चौघां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात येवून तो सेनगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.