कळमनुरी : कुंडलीक असोले यांचा मृतदेह आढळला
कळमनुरी कुंडलीक असोले यांचा मृतदेह आढळला
कळमनुरी - दोन दिवसापूर्वी ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेलेल्या कुंडलिक असोले यांचा मृतदेह रविवार (ता.२२) सकाळी सहा वाजता पुयना तलावात आढळून आल्यानंतर शोध घेणाऱ्या नागरिकांनी तो पाण्याबाहेर काढला शवविच्छेदन व इतर प्रक्रिया पूर्ण करून दुपारी असोलवाडी या त्यांच्या गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
शुक्रवार (ता.19) सायंकाळी सहाच्या सुमारास शेतातील आखाड्यावर बैलगाडी घेऊन निघालेल्या कुंडलिक असोले त्यांची पत्नी धुरपतबाई असोले या रस्त्यात असलेल्या ओढ्याच्या पाण्यामध्ये वाहून गेले होते. त्यानंतर परिसरातील नागरिक व प्रशासनाच्या वतीने ओढ्याच्या व तलावाच्या परिसरात शोध मोहीम हाती घेतली होती. दरम्यान शनिवार (ता.20) सकाळी तलावाच्या परिसरात धुरपतबाई आसोले यांचा मृतदेह आढळून आला होता.
त्यानंतर मोठ्या प्रयत्नानंतरही कुंडलिक आसोले यांचा शोध लागला नव्हता दिवसभर शेकडो नागरिकांनी हा परिसर पिंजून काढल्यानंतरही कुंडलिक आसोले आढळून आले नाही. त्यानंतर तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे यांनी या प्रकाराची माहिती जिल्हा आपत्ती कक्षाला देऊन पुणे येथील एनडीआरएफ यांच्याकडेही मदतीची मागणी केली होती. दिवसभर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने शोध मोहीम राबविल्यानंतर सायंकाळी उशिरा ही शोध मोहीम थांबविण्यात आली.
दरम्यान रविवार सकाळी सहा वाजताच पुयना तलावामध्ये कुंडलिक आसोले यांचा शोध घेण्यासाठी नायब तहसीलदार श्रीराम पाचपुते, समशेर पठाण ,कांता पाटील, असोलवाडी येथील संभाजी माने, तुळशीराम भिसे,माधव आसोले, नामदेव मुकाडे, शिवराम असोले, गजानन डुकरे,राजेश काळे, शालिकराम डाखोरे, संतोष असोले, खोब्राजी काळे यांच्यासह नागरिक दाखल झाले होते. शनिवारी झालेल्या पाण्यामुळे तलावाची पाणी पातळी वाढून गाळात अडकलेल्या कुंडलिक अस्वले यांचा मृतदेह आढळून आला असल्याची माहिती नायब तहसीलदार श्री पाचपुते यांनी पोलीस व वरिष्ठांना दिली आहे.
कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून कुंडलिक आसोले यांच्यावर त्यांचे मूळ गावी असलेल्या असोलवाडी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.