त्रिमुर्ती चोरीप्रकरणी एका संशयतावर गुन्हा दाखल
त्रिमुर्ती चोरीप्रकरणी एका संशयतावर गुन्हा दाखल
हिंगोली - वसमत तालुक्यातील माळवटा औद्योगिक वसाहतीमध्ये असलेल्या त्रिमुर्ती स्टॉकप्लाय कारखान्यातील मशनरी चोरीप्रकरणी अखेर एका संशयीतावर ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माळवटा येथे त्रिमुर्ती स्टॉकप्लाय कारखाना हा आशियातील पहिला सहकारी तत्वावरील प्लायवूड निमिर्ती प्रकल्प ठरला होता. अल्पावधीतच दर्जेदार प्लायवूड उत्पादन करणारा कारखाना म्हणून नावारूपाला आला होता. २००५ साली हा कारखान्याला अखेरची घरघर लागून बंद पडला होता. कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीच्या थकीत रकमेंसाठी भविष्य निर्वाह निधी विभागाने या कारखान्याला सील ठोकले होते. तेंव्हापासून हा कारखाना बंद आवस्थेत असून केवळ कारखान्यातील चोरी प्रकरणात चर्चीला जात होता.
मागील दोन महिन्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनच्या काळात चोरट्यांनी उरलेल्या मशनरी व इतर साहित्यावर डल्ला मारल्याचे उघड झाले होते. विशेष म्हणजे सदरील कारखाना सांभाळण्यासाठी सुरक्षा रक्षक असताना किंमती मशनरी चोरी कशा गेल्या हे संशयास्पद होते. कोट्यावधी रूपयाचा कारखाना नटबोल्टसहीत चोरून नेल्याने या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू झाली होती. अखेर कारखान्याचे तत्कालीन कार्यकारी संचालक शिवदास रामनगीरे यांनी वसमतच्या ग्रामीण पोलिस ठाण्यात कारखान्यातील २६ लाख ३० हजार रूपयाची विविध मशनरी चोरी प्रकरणी तक्रार दाखल केली.
यामध्ये मशनरीमध्ये उत्पादन विभागातील क्लाशी फार्मर मशीन, किंमत ५ लाख रूपये, प्रोस मशीनला जोडलेले भाग किंमत १ लाख रूपये, कटींग शॉ मशीन किंमत २ लाख रूपये, सॉडींग मशीन किंमत ४ लाख रूपये, सिमेंट पत्राच्या खालील लोखंडी एंगल किंमत १ लाख , दोन लोखंडी शटर किंमत ३० हजार , बाहेरील लोखंडी धातूचे बॉयलर किंमत ३ लाख , बाहेरील पुर्व बाजूस असलेली ट्रम्बलिंग मशीन किंमत ५ लाख रूपये, बाहेरील पुर्व बाजूस असलेली पराटे कटींग मशीन किंमत १ लाख रूपये, बाहेरील पुर्व बाजूस असलेली ड्रायर मशीन किंमत ४ लाख रूपये असे एकून अंदाजीत जुना वापर असलेली मशनरीची किंमत मिळून २६ लाख ३० हजार रूपये आहे.
सदरील तक्रारी प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयीत दिलीप कदम याच्याविरूध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे सदरील संशयीत हा कारखान्याचा तत्कालीन सुरक्षा रक्षक होता अशी माहिती आहे. संशयीत आरोपी फरार असून पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक बळीराम बंदखडके करीत आहेत.