हिंगोलीत लवकरच होणार कोरोना तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार
हिंगोलीत लवकरच होणार कोरोना
तपासणी लॅब, ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार
खासदार राजीव सातव यांचा पुढाकार
हिंगोली - येथे लवकरच कोरोना तपासणी लॅब सुरु होणार असून त्यासाठी ट्रू नेट मशीन उपलब्ध होणार आहे. पुढील पंधरवड्यात हि मशीन बसणार असून त्यामुळे हिंगोलीकरांची मोठी सोय होणार आहे. खासदार राजीव सातव यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
हिंगोली जिल्हयात मुंबई, पुणे, नाशीक या सारख्या मोठ्या शहरातून येणाऱ्या मजूरांची तसेच गावकऱ्यांची संख्या मोठी आहे. प्रत्येक तालुक्यात किमान आठ ते दहा हजार मजूर गावात येऊ लागले आहेत. हे सर्व जण टप्प्या टप्प्याने येत असले तरी त्यांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवणे, त्यांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठवले, त्यानंतर काही जणांचे अहवाल पॉझीटिव्ह आल्यानंतर संक्रमण साखळी शोधणे यासाठी मोठा कालावधी लागत आहे.
दरम्यान, हिंगोली येथे कोरोना तपासणी लॅब सुरु झाल्यास प्रशासनाला आणखी गतीने काम करणे शक्य होणार आहे. त्यासाठी खासदार राजीव सातव यांनी राज्याचे वैद्यकिय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना पत्र पाठविले आहे. त्यात हिंगोली येथे लॅब सुरु झाल्यास स्वॅब नमुन्यांचे अहवाल लवकर मिळणार असून कोरोना पॉझीटिव्ह व्यक्तीचे सामाजिक संक्रमण रोखता येणे शक्य होणार असल्याचे नमुद केले आहे. खासदार सातव यांच्या मागणीला शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून पुढील पंधरवड्यापर्यंत ट्रु नेट मशीन हिंगोलीत उपलब्ध होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. शासकिय रुग्णालयात हि मशीन ठेवली जाणार आहे. त्यामुळे हिंगोलीकरांना मोठा दिलासा मिळणार आहे.