वसईकडे जाणाऱ्या मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला
वसईकडे जाणाऱ्या मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेला
२५ गावांचा संपर्क तुटला ,हिंगोली-कळमनुरी वाहतूक ठप्प
हिंगोली - तालुक्यात गुरुवारी रात्री मुसळधार पाऊस पडल्याने पहिल्याच पावसात वसईकडे जाणाऱ्या रस्त्याचे तीनतेरा वाजले असून चक्क मोतनाई नदीवरील नळकांडी पूल वाहून गेल्याने जवळपास २५ गावांचा संपर्क तुटला असून कळमनुरी मार्गे नांदेकडे जाणारी वाहतूक व दळणवळण सेवा ठप्प झाल्याने नागरिकांची पंचायत झाली आहे.या पुलाची उभारणी २५ वर्षांपूर्वी केली असल्याचे नागरिकांनी सांगितले.
दरम्यान, हिंगोलीहून समगा -दुर्गधामनी वसई मार्गे कळमनुरी, नांदेकडे जाण्यासाठी हा मधला सोयीचा रस्ता असल्याने या परिसरातील नागरिकांना येजा करण्यासाठी सोयीचे होते व अंतर ही कमी असल्याने परिसरातील नागरिक पर्याय म्हणून याच रस्त्याचा नेहमीच वापर करीत असत. दरम्यान ,मृगणक्षत्रात झालेल्या पावसाने या पुलाचे बाजूची माती खचली होती. मात्र याकडे सार्वजनिक विभागाने दुर्लक्ष केले. साधा अधिकारी इकडे फिरकला नाही. परंतु गुरुवारी रात्री सुमारे दोन तास मुसळधार पाऊस झाला.त्यामुळे वसई व दुर्गधामनी पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने नदी, ओढे तुडुंब भरून वाहू लागले होते. त्यातच वसई येथील नळकांडी पुलावरून चार फूट पाणी वाहू लागल्याने नळकांडी पुलाचा अर्धा भाग वाहून गेला आहे. त्यामुळे आता यामार्गावरील दळण वळण सेवा ,वाहतूक सेवा ठप्प झाली असून सुमारे वीस ते पंचवीस गावाचा संपर्क तुटला आहे.
दुर्गधामनी ते वसई या दोन गावामधील जोडणारा पूल हा मागील वीस ते पंचवीस वर्षांपूर्वी नांदेड येथील गुत्तेदाराने सार्वजनिक विभागामार्फत काम केल्याचे जाणकार नागरिकांनी सांगितले.परंतु पावसाळ्या पूर्वी गावाना जोडणाऱ्या पुलाची पाहणी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने केली पाहिजे, नळकांडी पुलातील कचरा गोळा करून साफसफाई करणे महत्वाचे असताना संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असल्याने हा पूल वाहून गेला आहे. मागील सतत दोन वर्षे समगा येथील नळकांडी पूल वाहून गेला होता. पुन्हा थातूर मातूर डागडुजी करून हा पूल सुरळीत केला आहे. त्यामुळे अंतर्गत गावाना जोडणाऱ्या पुलाची पाहणी करून आताच दुरुस्ती केली तर पुढे होणाऱ्या घटना टाळता येतील. याकडे जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने मोडकळीस आलेल्या नळकांडी पुलाची पाहणी करून दुरुस्ती करावी अशी मागणी समगा येथील श्री.पंजाब सरकटे यांनी केली आहे. दरम्यान
मोतनाई नदीवरील पूल वाहून गेल्याने
समगा ,दुर्गधामनी, वसई, येडुत ,पूर, राजदरी,जामगव्हाण ,टाकळगव्हाण, टेम्भूरदरा ,आमदरी, बोलडा, कंजारा, बाळापूर, नंदापूर आदी वीस गावांचा संपर्क तुटला आहे.याबाबत जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता प्रकाश वायचाळकर यांच्याशी संपर्क केला ते सुट्टीवर असल्याचे समजले .मात्र प्रभारी कार्यकारी अभियंता यांच्याशी देखील याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता प्रतिसाद मिळाला नाही.