हिंगोली, पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
पुरात वाहून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडला
कळमनुरी - तालुक्यातील आसोलावाडी परिसरात पती-पत्नी बैलगाडीने शेतात जाताना ओढ्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याची घटना शुक्रवारी घडली होती. रात्री अंधार पडल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. मात्र, शनिवारी पहाटेपासून शोध घेतला असता सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास महिलेचा मृतदेह सापडला असून बचाव पथकाकडून पतीचा शोध घेणे सुरू आहे.
जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस झाला. अशातच कुंडलिक गोविंदा असोले आणि त्यांची पत्नी धुरपताबाई हे दोघेही शेताकडे जात असताना मात्र, बुडकी ओढ्यात मध्यभागी गेल्यावर अचानक पूर आला. आणि पाहता क्षणी दोघेही पुरात वाहून गेले. काल रात्रीपर्यंत दोघांचा पाण्यात शोध घेतला होता. मात्र, अंधार पडल्याने शोधकार्य थांबविण्यात आले.शनिवारी पहाटे घटनास्थळी बचाव पथ दाखल होऊन शोधकार्य सुरू केले. त्यावेळी धुरपताबाई यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना आढळून आला, तर कुंडलिक यांचा अद्यापही शोध लागला नाही. त्यामुळे ओढ्याचे पाणी ओसरण्याची वाट पाहावी लागत आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर, तहसीलदार कैलासचंद्र वाघमारे ,पोलीस अधिकारी, महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.