हिंगोली, दोन वर्षांपासून पीडीसीसी कडे ३१ लाख पडून जिल्हा परिषदेच्या स्थ्यायी समितीच्या बैठकीत मुद्दा
दोन वर्षांपासून पीडीसीसी कडे ३१ लाख पडून
जिल्हा परिषदेच्या स्थ्यायी समितीच्या बैठकीत मुद्दा गाजला
हिंगोली - जिल्हा परिषदेचे जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे मागील दोन वर्षांपासून ३१ लाख रुपये पडून होते याची कल्पना वित्त विभागाचे मुख्य लेखा अधिकारी हिवाळे यांना माहित नसल्याचा खळबळ जनक आरोप जिल्हा परिषद सदस्य अजित मगर यांनी गुरुवारी झालेल्या स्थायी समितीच्या पहिल्यांदाच ऑनलाईन बैठकीत उपस्थित केला.
येथील जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
गणाजी बेले यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी तीन महिन्यानंतर ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरस तहकूब सभा घेण्यात आली.यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, उपाध्यक्ष मनीष आखरे, समाज कल्याण सभापती फकिरा मुंढे, रत्नमाला चव्हाण, महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील ,अजित मगर, अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद माळी, धनवंतकुमार माळी , गणेश वाघ ,यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे कामे सुरू आहेत. ही कामे निकृष्ट दर्जाची होत असून या कामाची चौकशी करण्याची मागणी अजित मगर यांनी लावून धरली असता यावर आरोग्य अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी करून तसा अहवाल जिल्हा परिषदेकडे पाठवून संबंधित गुतेदाराची चौकशी करण्याचे अश्वासन दिले. याच बरोबर ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे प्रभारी कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे यांचा प्रभारी पदभार काढून घ्यावा असा मुद्दा उपस्थित केला असता अधिकाऱ्यांनी यावर निर्णय घेऊ असे सांगितले.
वैद्यकीय परिपूर्तीच्या कर्मचाऱ्यांच्या फायलीची अडवणूक आरोग्य विभाग व लेखा वित्त विभाग करीत असल्याचा आरोप महिला बालकल्याण सभापती रूपालीताई पाटील यांनी उपस्थित केला असता अधिकारी निरुत्तर झाले. आरोग्य अधिकारी यांच्यासह इतर अधिकाऱ्यांची बोबडी वळली. त्यानंतर सीईओ शर्मा यांनी यावर विचार करून निर्णय घेतला जाणार असल्याचे अश्वासन दिले.त्यानंतर कृषी सभापती रत्नमाला चव्हाण यांनी माझे वैयक्तिक कामे अर्थ विभागाकडून व इतर विभागाकडून अडवणूक केली जात असल्याचा आरोप केला असता सीईओ शर्मा यांनी यापुढे मी स्वतः लक्ष देणार असल्याचे सांगितले त्यामुळे या वादावर पडदा पडला.
तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किती गावात मास्क, सानिटायझर वाटप केले याच्या याद्या सीईओ शर्मा यांनी आरोग्य विभागाला मागितल्या आहेत.तसेच जिल्हा परिषद सदस्यांना देखील कोणत्या गावात काय वाटप केले याचा अहवाल सादर करण्याचा सूचना सीईओ यांनी आरोग्य विभागाला दिल्या आहेत. एकंदरीत जिल्हा परिषदेची झालेली स्थायीची पाहिलीच ऑनलाईन सभा विविध विषयांवर गाजली आहे.