सीईओ शर्मा यांच्याकडून पाच गावातील विकासकामांची पाहणी 

 



सीईओ शर्मा यांच्याकडून पाच गावातील विकासकामांची पाहणी 


नागरिकांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतल्या ,अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप


हिंगोली -  पंचायत समिती अंतर्गत  रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत. शुक्रवारी (ता.१२) फाळेगाव ,एकांबा, वांझोळा ,वडद ,माळहिवरा या पाच गावाना भेटी देत विकासकामांची पाहणी करून समाधान व्यक्त केले. तसेच गावकऱ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत संवाद साधला. व गटविकास अधिकारी यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. 


तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. यामध्ये मुख्य प्रश्न म्हणजे पिण्याच्या पाण्याचा असल्याने नरेगा अंतर्गत  सार्वजनिक विहिरीची कामे सुरू करण्यात आली. त्यानुसार माळहिवरा येथे नरेगा अंतर्गत सार्वजनिक विहिरीचे काम हाती घेण्यात आले होते. यापूर्वी या ठिकाणी पाण्याची टंचाई होत असल्याने टँकर च्या साहाय्याने ग्रामस्थांना तहान भागवावी लागत असे. मात्र सार्वजनिक विहीर पूर्ण केल्याने आजघडीला या विहिरीला मुबलक प्रमाणात पाणीसाठा निर्माण झाला असून माळ हिवरा गाव टँकरमुक्त झाले आहे. यासह इतर कामे पाहून सीईओ शर्मा यांनी समाधान व्यक्त केले.


त्यानंतर वडद येथील गावाला भेट देऊन सार्वजनिक विहिरीची पाहणी केली. या विहिरीचे काम देखील पूर्ण झाल्याने आता या गावातील पाण्याचा प्रश्न कायम स्वरूपी मिटला असल्याने नागरिकांशी संवाद साधला. तसेच एकांबा येथे मागील वर्षी ग्रामपंचायत व नागरिकांनी लोकसहभागातून  वृक्ष लागवड केली होती.याची पाहणी त्यांनी पाहणी करून ग्रामपंचायत सदस्य, नागरिक, यांनी केलेल्या कामाचे कौतुक केले. त्यानंतर सीईओ शर्मा यांनी फाळेगाव येथे मोर्चा वळविला असता या ठिकाणी सार्वजनिक विहिरीचे बांधकाम अर्धवट अवस्थेत दिसून येताच त्यांनी ग्रामसेवक व सरपंचाना धारेवर धरत सात दिवसाच्या आता विहिरीचे कामे पूर्ण करा असे आदेश दिले. तर वांझोळा येथे सार्वजनिक विहिरीचे कामे प्रगतिपथावर असल्याचे दिसून आले. कामे प्राधान्य देऊन तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी ग्रामसेवकाना दिल्या. 


याशिवाय प्रधानमंत्री आवास योजना, घरकुल पाहणी, दलित वस्तीची कामे, आदींची देखील पाहणी केली. यावेळी मजूर, गावकरी यांच्याशी संवाद साधला, काही अडचणी असल्यास त्या जाणून घेतल्या. एकंदरीत सीईओ राधाबीनोद शर्मा यांनी आज मॅरेथॉन दौरा काढून पाच गावातील  विकास कामाची पाहणी केली. यावेळी सुरु असलेली व पूर्ण झालेली कामे पाहून समाधान व्यक्त केले व अधिकाऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. इतर तालुक्याच्या मानाने हिंगोली तालुका विकास कामाच्या बाबतीत अव्वल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गटविकास अधिकारी डॉ. मिलिंद पोहरे, विस्तार अधिकारी संजय खंदारे, विष्णू भोजे, तांत्रिक अधिकारी जमील पठाण, मुकुंद कारेगावकार, आदींची उपस्थिती होती.


Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा