जि.प. परिसरात मास्क शिवाय कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई
जि.प. परिसरात मास्क शिवाय कोणी आढळून आल्यास दंडात्मक कारवाई करणार - सीईओ राधा बिनोद शर्मा
हिंगोली - कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी जीप कर्मचारी असोत किंवा कार्यालयीन कामासाठी येणारे अभ्यागत यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांनी सोमवारी (ता.१८) बैठकीत दिला आहे.
जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी विभाग प्रमुखांची बैठक सोशल डिस्टन्स पाळत घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी , अतिरिक्त सीईओ डॉ. मिलिंद पोहरे, महिला बाल कल्याण विभागाचे डेप्युटी सीईओ गणेश वाघ,पाणी व स्वछता विभागाचे आत्माराम बोन्द्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार, नितीन दाताळ ,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे जयराम मोडके,ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत वाघमारे, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रकाश वायचाळकर ,माध्यमिक शिक्षणाधिकारी पी. बी. पावसे,प्राथमिक शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, आदींची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लॉकडाऊन, संचारबंदी लागू करण्यात आली असून , या काळात अत्यावश्यक सेवा म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या विभागामार्फत बचत गट चालविण्यात येत आहेत.बचत गटा मार्फत मोठ्या प्रमाणात मास्क निर्मिती करून गरजू लोकांना उपलब्ध करून देण्यात आले आहे. आतापर्यन्त
६४ हजार मास्कची निर्मिती करून ग्रामीण भागात ग्रामपंच्यात मार्फत त्यांची विक्री करण्यात आली असल्याचे सांगून बचत गटाच्या सदस्यांचे कौतुक केले आहे.
तसेच जिल्हा परिषद आरोग्य विभागामार्फत बचत गटाना आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी १६ हजार मास्क तयार करण्याची ऑर्डर मिळाली होती.सोमवारी सदरील मास्कचा पुरवठा महाराष्ट्र जीवनोन्नती अभियान जिल्हा व्यवस्थापक श्री .जयराम मोडके यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांच्याकडे सुपूर्त केले जाणार आहे.
यावेळी सीईओ शर्मा यांनी विभाग प्रमुखांना बचत गटाचे मास्क वापरण्याचे आवाहन केले . याशिवाय जिल्हा परिषद परिसरात मास्क शिवाय कर्मचारी किंवा बाहेरील व्यक्ती आढळल्यास दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अभियान व्यवस्थापक मोडके यांनी बचत गटामार्फत तयार केलेले आणखी ही मास्क मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून मागणीनुसार पुरवठा करण्यात येईल असे सांगितले.सदरील मास्कची किंमत केवळ १५ रुपये असून हे कापडी असल्यामुळे स्वछ धुवून यांचा पुनर्वापर करता येतो.यामुळे
लॉकडाऊन काळात बचत गटांना रोजगार मिळून आर्थिक मदत होणार आहे. त्यासाठी सर्व विभाग प्रमुखांनी मास्क खरेदी करून कर्मचाऱ्यांना द्यावेत असे आवाहन सीईओ शर्मा यांनी केले आहे.
दरम्यान ,कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उपाय योजना म्हणून सीईओ शर्मा यांनी मंगळवारी व बुधवारी असे दोन दिवस प्राथमिक आरोग्य केंद्र,
क्वारंटाइन केंद्र ,शाळा आदी ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत. नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांनी संबंधित केंद्रात जाऊन पाहणी करण्याच्या सूचना सीईओ शर्मा यांनी दिल्या आहेत.