जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याविना ध्वजारोहण !
जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण
हिंगोली - कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाभरात गेली दीड महिन्यापासून सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी लागू असल्याने याचा फटका खुद्द जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांना बसल्याने त्यांना शुक्रवारी महाराष्ट्र दिनाच्या ध्वजा रोहनास उपस्थित राहता आले नाही. त्यामुळे हिंगोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच पालकमंत्र्याच्या गैरहजेरीत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी ध्वजारोहण केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज महाराष्ट्र राज्याच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते ध्वजारोहण समारोह सोहळा मोजक्याच अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी जिल्हा परिषदेचे सीईओ राधा बिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, राज्य राखीव बलाचे महासमादेशक मंचक इप्पर, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिणियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी किरण गिरगांवकर यांची उपस्थिती होती.
देशभरासह राज्यात कोरोना संसर्ग वाढल्याने,त्याला रोखण्यासाठी खबरदारी म्हणून सर्वत्र लॉकडाऊन व संचारबंदी सुरु आहे.त्यातच शुक्रवारी महाराष्ट्र दिन असल्याने दरवर्षी पालकमंत्री यांच्या हस्ते ध्वजारोहण करून जिल्ह्यातील चालू व मंजूर कामाची माहिती दिली असती. मात्र लॉकडाऊन मुळे पालकमंत्री यांना हजर राहता आले नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यालय वगळता जिल्ह्यात इतर ठिकाणी ध्वजारोहण करू नये असे आदेश काढल्याने केवळ जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र दिनाचा वर्धापन दिन अगदी साध्या पद्धतीने इतिहासात पहिल्यांदाच साजरा करण्यात आला.