अन दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या महिलेने रस्त्यातच दिला गोंडस कन्येला जन्म
..अन दुचाकीवरून घराकडे जाणाऱ्या महिलेने रस्त्यातच दिला गोंडस कन्येला जन्म
हिंगोली- जालना येथून कळमनुरीकडे दुचाकीने जाणाऱ्या एका मजुर महिलेची हिंगोली जिल्ह्यातील जलालढाबा येथे रस्त्यावरच प्रसूती झाली. लागलीच आजूबाजूच्या महिला त्या महिलेसाठी धावून आल्या. तिने एका गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन माता सुखरूप आहे. ही पिंपळदरी येथील बापूराव घोंगडे यांना कळताच त्यानी पत्नीसह एक खाजगी गाडी घेऊन त्या महिले जवळ धाव घेतली.
ज्योती शेळके असे प्रसूत झालेल्या महिलेच नाव असून, ती आपल्या नातेवाईकासह जालना जिल्ह्यात कामानिमित्त गेली होती. कोरोना मुळे अडकून पडलेल्या 20 ते 25 मजुर एका टेम्पोतुन कळमनुरीकडे रवाना झाले होते. तर ज्योती ही आपल्या मामाच्या मुलासोबत दुचाकीवर जात होती. रस्त्यावर जागोजागी पोलीस तैनात असल्याने, त्यानी भीत भीत पोलिसांची नजर चुकवून मार्ग काढत होते. ज्योती ही ओंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी मार्गे मामाच्या मुलासोबत जात असताना, जलालधाबा येथे पोहोचताच प्रसूती वेदना जाणवू लागल्या, त्यामुळे दोघेही बैचेन झाले. मात्र मामाच्या मुलाने रस्त्याच्या कडेला असलेल्या आखाड्यावरील महिलेला मदतीसाठी मागणी केली. तर महिला धावून आल्या अन त्यानी प्रसूतीसाठी मदत केली. अन ज्योतीने गोंडस कन्येला जन्म दिला. बाळ अन आई दोघेही सुखरूप असून, ही बाब पिंपळदरी येथील समाजसेवक बापूराव घोंगडे यांना समजल्यानंतर त्यांनी त्यांच्या पत्नीसह आवश्यक ती मदत घेऊन खाजगी गाडीसह धाव घेतली. त्यांनी महिलेला तातडीने पिंपळदरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. नंतर पाठीमागून टेम्पोत बसून आलेल्या इतर ही मजुरांनी ज्योतीवर ज्या दवाखान्यात उपचार सुरू आहेत तिथे धाव घेतली. बाळ अन आई दोघे ठणठणीत असल्याचे पाहून, ते मार्गस्थ झाले. या लॉकडाऊन मुळे अनेकांची मोठी दैना सुरू आहे. सुदैवाने या महिलेला सर्व मदत वेळेवर पोहोचली. या मदतीबद्दल ज्योतीने सर्वांचे आभार मानले.