बँकेच्या पाच शाखा व्यवस्थापकाना प्रत्येकी दोन हजाराचा दंड
बँकेच्या पाच शाखा व्यवस्थापकाना प्रत्येकी दोन हजाराचा दंड
सोशल डिस्टन्स राखणे पडले महागात
हिंगोली - शहरातील पाच बँकेत व्यवहार करण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टन्सचे पालन न करता मोठी गर्दी केल्याचा ठपका ठेवत पालिका कर्मचाऱ्यांनी पाच बँक व्यवस्थापकांना प्रत्येकी दोन हजाराचा दंड वसूल केला.
शहरात राज्य राखीव दलाच्या जवाना पाठोपाठ शहरातील रिसाला बाजार भागातील एका सामान्य रुग्णालयात काम करणाऱ्या परीचारिकेला कोरोना ची लागण झाल्याने संपूर्ण परिसर सील करून एक दिवसाआड अत्यावश्यक आस्थापना सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले होते. त्यानुसार शुक्रवारी (ता.८) किराणा, मेडिकल, भाजीपाला मार्केट यासह कृषी, कृषी यंत्रे, बँका देखील उघडण्यात आल्या होत्या.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हाधिकारी जयवंशी यांनी आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू केला असून,दुकान, बँका ,मेडिकल आदी ठिकाणी सोशल डिस्टन्सचे पालन करून व्यवहार करण्याचे आदेश सर्व बँक व्यवस्थापकांना दिले होते. शिवाय बँकेत गर्दी होणार नाही यासाठी बँकेसमोर लाईन मध्ये उभे राहण्यासाठी मंडप टाकण्याच्या सूचना दिल्या असताना काही बँकेने मंडप टाकलाच नाही. त्यामुळे बँकेत रोखीचे व्यवहार करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन होत आहे.सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याने गर्दी दिसून आल्याने कोरोनाचा संसर्ग होण्याची श्यक्यता नाकारता येत नाही. बँके समोर गर्दी होत असल्याची माहिती पालिका प्रशासनाला मिळताच त्यांनी बँकेकडे धाव घेतली आणि गर्दी कमी होत नसल्याचे पाहून उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैन्जने यांना या बाबत माहिती दिली असता त्यांनी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद शेख यांना व कर्मचाऱ्यांना सोबत घेत बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक, दोन स्टेट बँक ऑफ इंडिया अशा एकूण पाच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना साडे तीन वाजेपर्यंत शहर पोलीस ठाण्यात बसवून ठेवले.यामुळे बँकेतील कामकाज काही वेळ ठप्प पडले होते. त्यानंतर पालिकेने प्रत्येकी दोन हजाराचा दंड आकारात समज देऊन सोडून दिले. शहरातील पाच बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना पोलिसांनी चौकशीसाठी का नेले याची उलट सुलट चर्चा ऐकावयास मिळत होती. हा नेमका काय प्रकार आहे याबाबत शहर पोलीस ठाण्यात संपर्क केला असता कोणीही सांगायला तयार होत नसल्याचे दिसून आले.
या प्रकरणी एका बँकेच्या शाखा व्यवस्थापकाशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, गृह मंत्रालयाच्या सूचनेनुसार वित्तीय संस्था, बँक,
एटीएम,बाहेर कायदा व व्यवस्था अबाधित राखण्यासाठी बँका नियमांचे पालन करीत आहेत. मात्र बँकेत व्यवहार करण्यासाठी आलेले ग्राहक ऐकत नसल्याने सोशल डिस्टन्सचा भंग होत आहे. त्यामुळे सोशल
डीस्टस्नसिंग मेंटेन करण्याची जबादारी स्थानिक प्रशाशन व पोलिसांची आहे. अगोदरच सर्व बँक अधिकारी कोरोना संसर्ग होऊ नये यासाठी दडपणाखाली काम करीत असताना त्यात आता शाखा व्यवस्थापकावरच कारवाई म्हणजे उलटा त्रास सहन करावा लागत आहे.