दिलासादायक ; हिंगोलीत चार दिवसांपासून रुग्ण संख्या जैसे थे ..!
दिलासादायक ; हिंगोलीत चार दिवसांपासून रुग्ण संख्या जैसे थे ..!
ना पॉझिटिव्ह, ना निगेटिव्ह
हिंगोली - गेली चार दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत वाढ मंदावल्याने ना पॉझिटिव्ह ,ना निगेटिव्ह अशी काहीशी अवस्था झाली असून तोडफार का होईना जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत सातत्याने वाढ होऊन जवळपास कोरोना बाधितांची संख्या ९१ वर पोहचली होती. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची आकडेवारी पाहता शतक करते की काय असे वाटत होते. मात्र जिल्हा प्रशासनाने वेळीच खबरदारी घेत उपाय योजना केल्यामुळे बेरजेचे होणारे रूपांतर वजाबाकीत झाले आहे. त्यामुळे आजघडीला जैसे थे संख्या आहे.
जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या ९१ गेली होती. यातील जालना येथील दोन एसआरपीएफ जवान यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली. त्यामुळे आजघडीला एकूण ८२जवान रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आयसोलेशन वॉर्डात भरती आहेत. भरती केलेल्या ८२ जवानापैकी ८१ हिंगोली एसआरपी एफ तर एक जालना येथील आहे. यांना कोरोनाची लागण झाल्याने भरती कारण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच उर्वरित सहा रुग्णापैकी दोन रुग्ण सेनगाव, एक रुग्ण वसमत, दोन रुग्ण एसआर पीएफ ,एक जालना जवानाच्या संपर्कातील आणि एक सामान्य रुग्णालयातील परीचारिकेच्या समावेश आहे.
जिल्हा रुग्णालयात भरती केलेल्या कोरोना लागण झालेल्या रुग्णाची प्रकृती ठणठणीत असून कोणतीही गंभीर लक्षणे नसल्याचे रुग्णालय प्रशासनांनी सांगितले .तर यातील आठ गंभीर कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची तब्येत खालावल्याने त्या जवानांना औरंगाबाद येथे पुढील उपचारासाठी हलविले असल्याचे देखील डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
आतापर्यंत जिल्हा रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात व क्वारंटाइन सेंटर मध्ये १३५७ व्यक्तींना संशयित म्हणून भरती केले होते. त्यापैकी १२५४ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह असून१०८७ व्यक्तींना सुट्टी देण्यात आली. तर आजघडीला२५६ रुग्ण रुग्णालयात भरती असून उपचार घेत आहेत. तसेच ६ जणांचे अहवाल अद्यापही प्रलंबित असल्याचे जिल्हा शालीचकित्सक डॉ. किशोर प्रसाद
श्रीवास यांनी सांगितले. त्यामुळे सामान्य रुग्णालयात गेली चार दिवसांपासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या जैसे थे असल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा श्वास घेतला आहे.
जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनाने रुग्णासाठी काय उपाय योजना केल्या आहेत याचा आढावा घेऊन रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले. तर कोरोना बाधित जवानांची भेट घेऊन कैफियत एकूण घेतली. त्यानंतर कोरोना योध्याना धीर देत आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा विश्वास दिला.