पंजाबहुन परतलेल्या एका चालकास कोरोनाची बाधा, कोरोना बाधितांची संख्या ४७
पंजाबहुन परतलेल्या एका चालकास कोरोनाची बाधा
कोरोना बाधितांची संख्या ४७ वर , रुग्ण संख्येत कमालीची वाढ
हिंगोली - क्वारंटाइन करण्यात आलेल्या राज्य राखीव दलाच्या २५ जवानासह पंजाबहून परतलेल्या एका चालकास अश्या एकूण २६ जणांना कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल शुक्रवारी (ता. १) साडे नऊच्या सुमारास प्राप्त झाला असून आता कोरोना बाधितांची संख्या ४७ वर पोहचली असून ,तर एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला सुट्टी देण्यात आली आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रसाद कुमार श्रीवास यांनी दिली.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात क्वारंटाइन करण्यात आलेल्या एसआरपीएफच्या २५ जवानांचे स्वाब नमुने नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील प्रयोग शाळेकडे तपासणी साठी पाठविले होते .त्या सर्वांचा अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आला असल्याने रुग्ण संख्येत वाढ झाली आहे. तर वीस जवानांना एसआरपीएफच्या हॉल मध्ये क्वारंटाइन केले आहे. व पाच जवान आयसोलेशन वॉर्डात भरती केले आहेत. त्यामुळे या सर्वांचे अहवाल पूर्वी निगेटिव्ह आले होते. आतापर्यंत एसआरपीएफच्या सुमारे ४१ जवानांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पस्ट झाले आहे. यातील३५जवान मालेगाव येथून आले तर ८ जवान मुंबई येथे कर्तव्यावर होते.
तसेच जिल्ह्यातील आखाडा बाळापूर येथील २५ वर्षीय पुरुष हा खाजगी ट्रॅव्हल वरती कार्यरत होता.गुरुवारी (ता.२३) रोजी तो भाविकांना सोडण्यासाठी नांदेड येथून पंजाब कडे गेला होता. त्यानंतर भाविकांना सोडून मंगळवारी (ता.२८) नांदेड येथे दाखल झाल्यानंतर त्याला शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय येथे क्वारंटाईन करण्यात आले. त्याचे स्वाब नमुने तपासणी साठी प्रयोग शाळेकडे पाठविले असता शुक्रवारी सकाळी त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्यास शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
आजघडीला जिल्ह्यात सुमारे ४७ कोविड -१९, रुग्ण बाधित असल्याचे अहवालावरून समोर आले.तर यातील एक रुग्ण ठणठणीत होऊन बरा झाल्याने त्याला सुट्टी देण्यात आली. सध्या ४६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह असून एका कोरोना बाधित रुग्णास नांदेड येथे भरती केले आहे. याशिवाय एकाला औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटल येथे भरती केले आहे. त्यामुळे आजघडीला हिंगोली येथे ४५ रुग्णावर उपचार सुरु असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. किशोर प्रसाद श्रीवास यांनी सांगितले.
गुरुवारी जिल्ह्यात कोरोना संसर्ग झाल्याची संख्या वीस असताना एकाच दिवसात सुमारे २६ रुग्ण संख्या वाढल्याने हिंगोली जिल्हा हा मराठवाड्यात औरंगाबाद पाठोपाठ दुसऱ्या क्रमांकावर रेड झोन मध्ये आला आहे. दिवसेंदिवस कोरोना बाधितांच्या संख्येत रोज नवीन रुग्णाची भर पडत असल्याने जिल्हा प्रशासनाची चिंता आणखी वाढली आहे.