दिलासादायक ; वसमत येथे पाच जण निगेटिव्ह तर एक ४२ वर्षीय पुरुष पॉझिटिव्ह
जिल्ह्यातील कोरोना रुग्ण संख्येचा आलेख स्थिर
हिंगोली - वसमत येथील कोरोना केअर सेन्टर येथील भरती करण्यात आलेल्या पाच रुग्णाचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला तर एक मुंबई वरून परतलेला ४२ वर्षीय रुग्णाला कोरोना लागण झाल्याचा अहवाल प्राप्त झाला असल्याने जिल्ह्यातील कोरोना आलेख घसरल्याने रुग्ण संख्या ७० वर आली आहे.
दरम्यान, वसमत येथे मुंबई वरून आलेल्या मजुरांना कोरोना सेंटर येथे भरती करण्यात आले होते ,यातील पाच रुग्णांचा अहवाल गुरुवारी प्राप्त झाला असून हा अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने समाधान व्यक्त होत आहे. तर दुसरीकडे मुंबई येथून वसमत येथे परतलेल्या एका ४२ वर्षीय पुरुषाला कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून समोर आले आहे.
आतापर्यंत जिल्ह्यात १६६ रुग्ण कोरोना विषाणूचे आढळून आले आहेत .त्यापैकी ९६ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी परतले आहेत. आता आजघडीला ७० पॉझिटिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहेत. दरम्यान सद्य स्थितीत भरती करण्यात आलेल्या रुग्णापैकी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे दहा, औंढा ४,भिरडा एक, सुरज खेडा एक, समुदाय आरोग्य अधिकारी दोन, पहेनी एक, अश्या एकूण वीस रुग्णावर उपचार सुरू असून कोणतेही लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.
आतापर्यंत जिल्ह्यात एकूण २११० रुग्णांना भरती करण्यात आले असून, त्यापैकी १७९० रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १६९१ रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ४१२ रुग्णावर उपचार सुरु असून २३३ रुग्णांचे अहवाल प्रलंबित आहेत.