कोरंटाइन केलेल्या ७१ जवानांचे थ्रोट नमुने निगेटिव्ह प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास
कोरंटाइन केलेल्या ७१ जवानांचे थ्रोट नमुने निगेटिव्ह
प्रशासनाने सोडला सुटकेचा श्वास
हिंगोली - संचारबंदी काळात मालेगाव येथून कर्तव्य पार पाडून परतलेल्या ७१जवानांना कोरंटाइन मध्ये भरती करण्यात आले होते. त्यांचे दोन्ही थ्रोट नमुने निगेटिव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने सुटकेचा मोकळा श्वास सोडला आहे.
जिल्ह्यात मालेगाव, मुंबई येथून राज्य राखीव दलाचे १९४जवान कर्तव्य बजावून हिंगोलीत परतल्यानंतर त्यांना क्वारंटाइन करून त्यांचे थ्रोट नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले असता यातील ४७ जवानांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली होती. मात्र यातील उर्वरित जवानांना क्वारंटाइन करून त्यांचे स्वाब थ्रोट नमुने प्रयोग शाळेकडे पाठविले असता यातील ७१ जवानांचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आले असल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाचे ५२ रुग्ण आढळून आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपाय योजना केल्या जात आहेत. मात्र गेली दोन दिवसापासून क्वारंटाइन केलेल्या कोरोना बाधित जवानांचे अहवाल पॉझिटिव्ह न आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.कोरोना बाधित ५२ रुग्णापैकी ४८ रुग्णांना शासकीय रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्डात भरती करून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे जिल्हाशल्य चिकित्सक डॉ. कुमार प्रसाद श्रीवास यांनी सांगितले. तर यातील ४७ रुग्णांची प्रकृती स्थिर असून ,सध्या कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसत नाहीत. या जवानांना दम लागत असल्याने त्यांना ऑक्सिजन लावण्यात आले असल्याने त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये हलविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
आजघडीला जिल्ह्यात १३००कोरोना संशयिताची संख्या आहे.यापैकी २०० जणांचे थ्रोट नमुने अहवाल प्रलंबित असून, आतापर्यत यातील केवळ५२ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे अहवालावरून स्पस्ट दिसून येते. तर ९६८ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले.तसेच ७०१ रुग्णांना १४ दिवस क्वारंटाइन पूर्ण होऊन बरे झाल्यानंतर घरी पाठविण्यात आले आहे.तर आजघडीला ५९३ रुग्ण क्वारंटाईन कक्षात भरती असल्याचे देखील त्यांनी सांगितले.