सेनगाव : आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीस नकार दिल्याने नवजात अर्भक दगावले
आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीस नकार दिल्याने नवजात अर्भक दगावले
सेनगाव तालुक्यातील खुडज येथील घटना
हिंगोली - सेनगाव तालुक्यातील खुडज येथील आरोग्य उपकेंद्रात प्रसुतीसाठी गेलेल्या एका महिलेची तपासणी न करता शिवीगाळ करून हाकलुन दिल्याचा प्रकार घडला असून यात घरीच प्रसुती झाली मात्र उपचाराअभावी बाळ दगावले असल्याची तक्रार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
याबाबत खुडज येथील मथुराबाई परमेश्वर गायकवाड यांनी
दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, मला एक मुलगा असून
दुसऱ्या बाळासाठी मला नऊ महिण्याचे दिवस गेले होते.
त्यामुळे सोमवार (ता.25) रात्री अकरा वाजता पोट दुखत असल्याने पती परमेश्वर गायकवाड यांच्या सोबत खुडज येथील आरोग्य उपकेंद्रात गेले असता येथे असलेल्या
कर्मचाऱ्याने तपासणी तर केली नाही व हाकलुन दिले. आमची परिस्थीती हालाकीची असल्याने अम्बुलन्सची सेवा सुध्दा उपलब्ध करून दिली नाही व खाजगी वाहन देखील लॉकडाऊनमुळे मिळाले नसल्याचे निवेदनात नमुद केले आहे.
त्यामुळे मुकाटपणाने आम्ही घरी आलो त्यानंतर मला रात्रभर खुप वेदना होत होत्या व सकाळी सात वाजता
प्रसुती होवून कन्यारत्न झाले. ती रडत नसल्याने पती परमेश्वर गायकवाड व पंचायत समिती सदस्य सुनिल
मुंदडा यांना घेवून परत आरोग्य उपकेंद्रात गेले असता तेथील कर्मचाऱ्याने माझे प्रसुतीचे काम नाही मी येणार नाही असे त्यांना सांगितले. त्यानंतर श्री. मुंदडा यांनी
तालुका आरोग्य अधिकारी यांना माहिती दिली. त्यांनी
ॲम्बुलन्स पाठवून उपकेंद्रातील कर्मचारी सोबत देऊन माझे
पती मी व बाळाला जिल्हा सामान्य रुग्णालयात घेवून गेले असता डॉक्टरांनी बाळ मयत असल्याचे सांगितले. तुम्हाला येण्यास उशीर झाला असल्याने माझ्या बाळाचा
मृत्यू झाला असल्याचे दिलेल्या निवेदनात नमुद आहे.
खुडज येथील उपकेंद्रात उपचार झाले असते तर माझे बाळ वाचले असते त्यामुळे या उपकेंद्रात निर्दयी असलेल्या कर्मचाऱ्यावर योग्य ती कार्यवाही करावी माझ्यावर जो
प्रसंग आला तो दुसऱ्या गावातील कोणावर येऊ नये माझ्यावर झालेल्या या अन्यायाची चोकशी करून
संबधीतावर कारवाई करावी अशी मागणी मथुराबाई गायकवाड यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या बाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी मथुराबाई
गायकवाड यांच्या झालेल्या प्रसुती संदर्भात साखरा येथील वैद्यकिय अधिकारी यांना पत्र देवून चौकशी पथक नेमून तीन दिवसात यांची चौकशी करून आपल्या अभिप्रायासह
वस्तुनिष्ठ घटनाक्रम अहवाल सर्व पुराव्यासह सादर करण्याचे आदेश दिले असून त्यानंतर योग्य ती कारवाई
केली जाईल असे डॉ. रुणवाल यांनी सांगितले.