डेप्युटी सीईओ माळी यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी
अधिकाऱ्यांना दिल्या सूचना, क्वारंटाईन सेंटरची केली पाहणी
हिंगोली - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयी सुविधा उपलब्ध आहेत किंवा नाही यांची पाहणी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी यांनी मंगळवारी सेनगाव तालुक्यात मॅरेथॉन दौरा काढला असता प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देऊन जिल्हा परिषदेच्या क्वारंटाईन सेंटरला भेटी देऊन व्यवस्था करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
जिल्ह्यात आजघडीला कोरोना बाधितांची संख्या१४ वर गेली आहे.बाहेर जिल्ह्यातील नागरिकांचे लोंढे परत आपल्या गावी येण्यासाठी उत्सुक असून येणाऱ्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्र अपुरे पडणार असल्याने जिल्हा प्रशासनाने त्या गावातील प्राथमिक शाळेत आलेल्या नागरिकांना क्वारंटाइन केले जाणार आहे. शाळेत पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, लाईट, पंखे आहेत किंवा नाही चाचपणी करून तातडीने सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
याशिवाय गोरेगाव ,कौठा ,साखरा, कापड शिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी दिल्या. गोरेगाव केंद्रात बायकोफ मशीन ,ऑक्सिजन सिलेंडर, मास्क९५,आणि डिलिव्हरी प्रमाण कमी असल्याचे आढळून आले. तर कौठा प्राथमिक आरोग्य केंद्राचे नवीन इमारतीत स्थलांतर झाले नाही. तसेच कापडशिंगी प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण योजनेतील उद्दिष्ट पूर्ण न केल्याने सध्या बंद असल्याचे दिसून आले. याबाबत माळी यांनी नाराजी व्यक्त करीत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच सर्व ठिकाणी ग्रामरक्षक शीघ्र पथकासी चर्चा करून अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या. बाहेर जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची नोंद घेऊन संबंधितांना कळविणे आदी सूचना दिल्या.शिवाय गोरेगाव, साखरा येथील कृषी सेवा केंद्रांना भेटी दिल्या. तर वाढोना येथील चेक पोस्ट भेट दिली असता एकाही कर्मचाऱ्यांनी मास्क न लावता दस्ती बांधली होती. त्यामुळे बचत गटांनी तयार केलेले मास्क देण्यात आले. तसेच ग्राम रक्षक शीघ्र पथकाला देखील मास्क वाटप करण्यात आले. तसेच गोरेगाव येथे रास्तभाव दुकानामध्ये सोशल डिस्टन्स पाळले जात नसल्याचे आढळून आल्याने दुकान दारांना सोशल डिस्टन्स ठेवून धान्य वाटप करण्याच्या सूचना दिल्या.
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक ,जिल्हा आरोग्य अधिकारी यांना गरोदर मातांची प्रसूती पूर्व तपासणी करण्याच्या सूचना देऊन त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्यामुळे मंगळवारी डेप्युटी सीईओ धनवंत कुमार माळी ,डॉ. शिवाजी पवार ,राधेश्याम परांडकर यांच्या पथकाने प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेटी देण्याचा सपाटा लावला. कोरोना मुळे शेवटच्या टप्प्यात असलेल्या गरोदर मातेची पूर्व तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यामुळे हा आजार होणाऱ्या बाळाला होऊ नये याची दक्षता म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
Attachments area