परभणी महानगरपालिका यावर्षी टॅंकरमुक्त, टॅंकरलॉबीचं ग्रहण सुटलं


 

टॅंकरलॉबीचं ग्रहण सुटलं

परभणी महानगरपालिका यावर्षी टॅंकरमुक्त

 

परभणी,(प्रतिनिधी): सुधारीत पाणीपुरवठा योजनेतून पाणीपुरवठा सुरू झाल्याच्या पार्श्वभूमीवर यावर्षीच्या उन्हाळ्यात महानगपालिका हद्दीतील प्रभागांना टंचाईची झळ सोसावी लागली नाही किंवा प्रशासनास सुध्दा आतापर्यंत पाणी पुरवठ्याकरिता एक टॅंकरसुध्दा तैनात करावा लागला नाही.

गेल्या काही वर्षापासून प्रत्येक उन्हाळयात परभणीवासियांनी उष्णतेच्या लाटेबरोबर पाणी टंचाईच्या भयावह झळा, यातणा सोसल्या आहेत. 15 ते 20 दिवसांआड होणारा पाणीपुरवठा , तो वेळीअवेळी, विशेषतः मध्यरात्री किंवा पहाटे तसेच हंडाभर पाण्यासाठी श्रमिकांची कुटुंबियांसह भटकंती हे विदारक चित्र गेल्या वर्षीपर्यंत प्रत्येकाने अनुभवले आहे. नव्हे त्याचे चटके सुध्दा सोसले आहेत. ते एवढे की, अन्य जिल्ह्यात परभणीकरांच्या या सहनशीलतीचे किस्सेही प्रत्येक वर्षी रंगवल्या गेले आहेत. सोशल मिडियातून टंचाईच्या काळात परभणीकरांच्या सोशकतेबद्दल असंख्य किस्से फॉरवर्ड होत राहिले. त्यात विशेषतः परभणीचे सासर नको बाई.., परभणीत सुट्टीत माहेरी नको. इतपर्यंत विडंबन होत आले आहे.

एवढे किस्से रंगत असतांना सुध्दा या जिल्ह्यातील नेतृत्वास, महानगरपालिकेच्या आजी-माजी पदाधिका-यांना या टंचाई विषयी कधीच फारसे गांभिर्य वाटले नाही.सत्तारूढ पक्षाच्या मंडळींनी टंचाईबाबत कधी अव्वाक्षर काढले नाही. विशेष म्हणजे  विरोधकांनी कधी पोट्याच्या देठापासून बोंब मारली नाही. परिणामी परभणीकर टंचाई म्हणजे आपल्या पाचीला पुजली या अर्विभावात आजपर्यंत वावरले आहेत. गंमत म्हणजे काही वर्षी पुरेसा पाऊस होवून सुध्दा परभणीकर कृत्रिम टंचाई अनुभवत आले आहेत. त्यास महानगरपालिकेतंर्गत तीव्र उदासनिता पाणीपुरवठा विभागातील कोलमडलेल्या यंत्रणा कारणीभुत ठरल्या आहेत.

अशा या पार्श्वभूमीवर या उन्हाळ्याच्या तोंडावरच येलदरीतून सुधारीत पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून पाणी सोडल्या गेले. ते पाणी धर्मापुरीतील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पोचले आणि तेथून ते पाणी नव्याने बांधलेल्या टाक्यापर्यंत चढवल्या गेले. त्यामुळे या उन्हाळ्यात परभणीकरांना अंथरलेल्या काही नवीन व बहुतांशी जुन्या वाहिन्यांतून पाणीपुरवठा सुरू झाला आहे. त्यातच आठ दिवसाआड पाणीपुरवठा सुरू करीत महापालिकेने परभणीकराना अलगदपणे सुखद धक्का दिला. त्यास कारणीभुत कोण, हे प्रश्न आता गौण. परभणीकरांना यावर्षीचा उन्हाळा टंचाईअभावी सुुसय्य ठरला आहे.

आयुक्तांनी सोडला सुटकेचा निःश्वास

गेल्या काही वर्षापासून टंचाईच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतंर्गत टॅंकर लॉबीने मोठ्या प्रमाणावर डोकेवर काढले होते. त्याचेही किस्सेस किस्से रंगले. विशेषतः काही सदस्यांनीच या लॉबीतून पाणी ही कॅश करण्याचा धंदा सुरू केला होता. मनपाच्या जलकुंभातून आरेरावी करीत पाणी भरून त्या टॅंकरच्या पाण्याच्या विक्रीचाही उद्योग सुरू झाला होता. तर काही सदस्यांनी स्वतः टॅंकर खरेदी करीत आपआपल्या प्रभागातील नागरिकांची तहान भागविण्याचा इनामेइतबारे प्रयत्न केला. तर काहीनी स्वतःचे टॅंकर महापालिकेस भाड्याने लावून त्यातून टंचाई कॅश केली. परंतू यावर्षी या सा-या प्रकारांना मोठ्या प्रमाणावर पूर्णविराम मिळाला आहे. या उन्हाळ्यात एक टॅँकरसुध्दा आजपर्यंत लावावा लागला नाही. 

सुमारे दीड कोटी रुपयांची बचत

टॅंकरद्वारे पाणीपुुरवठ्यावर सुमारे दीड कोटी रुपये खर्च होत होते. विशेषतः टंचाईच्या काळात टॅंकरलॉबीवर कोट्यावधी रुपयांचा खर्च होत होता. आता दरमहा किंवा हंगामातील खर्च थांबणार आहे. त्यामुळे मनपाची मोठी बचत होणार आहे. 

Popular posts from this blog

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कृषी अधिकाऱ्याच्या दालनात आंदोलन

काकडदाभा येथे अनेकांचा आमदार बांगर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश

ओमप्रकाश देवडा बँकेला ३.१५ कोटीचा निव्वळ नफा