तब्बल पाच दिवसानंतर सुरु होणार अत्यावश्यक सेवा
तब्बल पाच दिवसानंतर सुरु होणार अत्यावश्यक सेवा
जिल्हाधिकारी जयवंशी यांचे आदेश
हिंगोली - जिल्ह्यात कोरोना बांधीतांची वाढत असलेल्या संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने मागच्या पाच दिवसापासून सर्वच आस्थापना बंद ठेवल्या होत्या. आता सोमवारपासून (ता.4) एक दिवसाआड भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुरू होणार असल्याचे आदेश जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सार्वजनिक किंवा खाजगी जागेत पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तीनी एकत्र येणे, थांबणे, चर्चा करणे याला मनाई करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यात कोरोना बाधीतांची वाढत असलेली संख्या लक्षात घेता जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी बुधवारपासून (ता.29) ते रविवारपर्यत (ता.3) जीवनावश्यक वस्तुच्या दुकानासह एक दिवसाआड सुरू असलेला बाजार देखील बंद केला होता.
आता परत बाजारासह किराणा दुकान, भाजीपाला, दुधविक्री केंद्रे, परवाना असलेले चिकन, मटन शॉप, बेकरी, स्वीटमार्ट संबधीत दुकाने दिवसाआड सुरू राहणार आहेत. ही दुकाने सकाळी नऊ ते एक यावेळात सुरू राहणार आहेत. तसेच कृषीसेवा केंद्र, कृषीयंत्रे, अवजारे, ट्रॅक्टर, त्याचे सुटे भाग या दुकानासह इलेक्ट्रीक्स वस्तू विक्रीची दुकाने देखील सुरू राहणार आहेत. सोमवार (ता.04), बुधवारी (ता.6), शुक्रवार (ता.8), रविवार (ता.10) मंगळवार (ता.12), गुरूवार (ता.14), शनिवार (ता.16) ठरवून दिलेल्या वेळाप्रमाणे सुरू राहणार आहेत.
यासाठी संबधितांनी दुकाने सुरू करताना जागेचे सॅनिटायझेशन करूनच सुरवात करावी, दुकानातील कामगार, खरेदीदार याची नोंद ठेवणे गरजेचे आहे, काम करणाऱ्यासाठी मास्कचा वापर करणे बंधनकारक आहे. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाचे व विक्रेत्यांचे अंतर एक मिटरचे अंतर राहील याची दक्षता घ्यावी, कामगाराची तपासणी थर्मल गणने करावी आदी नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे.
तसेच खरेदीसाठी येणाऱ्यांनी दुचाकी, चारचाकी वानाहचा वापर करू नये पायी येवून सामानाची खरेदी करावी दिलेल्या आदेशाचे पालन करावे तसे न झाल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी जयवंशी यांनी दिले आहेत.