दिलासादायक बातमी :- हिंगोली एसआरपीएफचे दोन जवान कोरोनामुक्त
एसआरपीएफचे दोन जवान कोरोनामुक्त
बेरजेचे वजाबाकीत रूपांतर झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा
हिंगोली - येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार घेत असलेल्या ८४ कोरोनाबाधित रुग्णांपैकी दोन जवानांचा १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी (ता. आठ) रुग्णालयातून सुटी देण्यात आली.त्यामुळे सातत्याने होत असलेल्या बेरजेचे आता वजाबाकीत रूपांतर झाल्याने जिल्हा प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ९१ कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. यातील पहिला कोरोनाधित आढळलेल्या रुग्णाचे १४ व १५ दिवसांनंतरचा थ्रोट स्वॅब निगेटिव्ह आल्याने त्याला कोरोनामुक्त करण्यात आले. तसेच रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. दरम्यान, त्यानंतर तब्बल ९० कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. यासर्व रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यात एसआरपीएफच्या ८४ जवानांचा समावेश आहे. शुक्रवारी यातील दोन जवानांचे १४ व १५ दिवसांनंतर घेतलेले थ्रोट स्वॅब अहवाल सायंकाळी निगेटिव्ह आले. त्यामुळे दोन जवान कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डॉक्टरांच्या उपस्थितीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या एसआरपीएफचे ८२ जवानांसह सेनगाव येथील दोन, वसमत येथील एक, जालना एसआपीएफ जवानाच्या संपर्कातील दोन व जिल्हा रुग्णालयातील परिचारिकेचा समावेश आहे. दरम्यान, एसआरपीएफ जवानांपैकी सहा जवानांना औरंगाबाद येथील धूत हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे.
१३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह
जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकेला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तिच्या संपर्कातील १३ जनांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या १३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.