माथा येथे मित्रानेच केला मित्राचा चाकूने भोसकुन खुन
वडिलांना शिवीगाळ केल्याचे कारण
औंढा नागनाथ - तालुक्यातील माथा येथे वडिलांना शिवीगाळ केल्याच्या कारणावरून मित्रानेच मित्राचा चाकूने भोसकून खून केल्याची घटना घडली असून या प्रकरणी गुरुवारी औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला असून एकाला अटक करण्यात आली आहे तर तीघेजण फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ तालुक्यातील माथा येथे माधव पांडूरंग पोले (वय 22) याचे त्याचा मित्र दिनेश उर्फ दगडू मोळंके याचे वडिल भानुदास मोळंके यांच्या सोबत दोन दिवसांपुर्वी भांडण झाले होते. यावेळी माधव याने भानुदास मोळंके यांना शिवीगाळ केली होती. त्याचा राग दिनेशच्या मनात होता. बुधवारी (ता.20) रात्री दहा वाजण्याच्या सुमारास दिनेश याने माधव पोले याच्या घरी जाऊन त्यास बाहेर बोलावले. त्यानंतर घराजवळच असलेल्या इतर तिघांनी माधव पोले याचे हातपाय धरले तर दिनेश मोळंके याने धारदार चाकूने त्याच्या छातीवर डाव्या बरगडीवर, डाव्या हाताच्या दंडावर वार करून गंभीर जखमी केले. यात माधव पोले याचा मृत्यू झाला.
याबाबत पांडूरंग पोले यांच्या फिर्यादीवरून दिनेश उर्फ दगडू भानुदास मोळके, गजानन भानुदास मोळके, कल्याण सुरेश मोळके, भानुदास मारोती मोळके सर्व राहणार माथा यांच्या विरोधात औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान या दिनेश उर्फ दगडू मोळके याला अटक करण्यात आली आहे तर तीघेजण फरार आहेत.