जिल्ह्यात 1168 कोटी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
जिल्ह्यात 1168 कोटी पिककर्ज वाटपाचे उद्दिष्ट
बँकांनी कर्जवाटप सुरू करावे, जिल्हा उपनिबंधकाच्या सुचना
हिंगोली - जिल्ह्याला आगामी खरीप हंगामासाठी 1168 कोटी 95 लाख रुपयाचे पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक सुधीर मैत्रेवार यांनी दिली आहे.
आगामी खरीपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांना वेळेत कर्ज उपलब्ध करण्याच्या सुचना सहकार विभागाने बँकांना दिल्या आहेत. जिल्ह्यात असलेल्या एकूण उद्दिष्टापैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 148 कोटी 89 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. इतर बँकांना 859 कोटी 10 लाख रुपयाचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर ग्रामीण बँकांना 160 कोटी 96 लाख असे एकूण 1168 कोटी 95 लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडानमुळे कर्जवाटप प्रक्रिया सध्या मंदावली आहे. दरवर्षी खरीप हंगामातील कर्ज वाटपाची प्रक्रिया एप्रील महिण्यापासून सुरू केली जाते यावर्षी हा महिणा लॉकडानमध्ये गेला आहे. त्यामुळे ज्या प्रमाणे कर्जवाटप होणे अपेक्षीत होते त्याप्रमाणे झाले नाही. जिल्ह्यातील 73 शेतकऱ्यांना पिककर्जाचे वाटप करण्यात आले आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने तर एकाही शेतकऱ्याला कर्ज उपलब्ध करून दिलेले नाही.
जिल्हा मध्यवर्ती बँकेने 26 शेतकऱ्यांना 7 लाख 91 हजार रुपयाचे पिककर्ज वाटप केले आहे. त्याची टक्केवारी 0.05 एवढी आहे. व्यापारी बँकानी 47 शेतकऱ्यांना 49 लाख रुपयाचे कर्ज वाटप केले आहे. त्याची देखील टक्केवारी 0.05 आहे. खरीप हंगामात पेरणीसाठी शेतकऱ्यांना संकटाचा सामना करावा लागणार आहे. बँकांनी पिककर्ज वाटप करताना शेतकऱ्याची अडवणूक करू नये मुदतीतील शेतकऱ्यांना पिककर्ज उपलब्ध करून द्यावे. प्रत्येक बँकांना उद्दिष्ट ठरवून देण्यात आले आहे. त्याप्रमाणे पिककर्ज वाटप करावे अशा सुचना जिल्हा उपनिंबधक सुधीर मैत्रेवार यांनी दिल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे पिककर्ज अद्याप बँकांनी सुरू केले नाही या प्रक्रियेला उशीर लागणार आहे. महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्तीची अमंलबजावणी सुरू आहे यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात आली असल्याचे श्री. मैत्रेवार यांनी सांगितले.