हिंगोली, पालकमंत्र्यांकडे निवेदनाचा महापूर
पालकमंत्र्यांकडे निवेदनाचा महापूर
विविध संघटनेने दिले निवेदन,काहींनी कैफियत मांडली
हिंगोली - जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड हिंगोली दौऱ्यावर आल्या असता, रविवारी(ता.१०) विविध संघटनांनी पालकमंत्री यांची विश्राम गृहावर भेट घेत प्रलंबित प्रश्नाकडे लक्ष देण्यासाठी निवेदन दिले. आणि आपली कैफियत मांडली.
दरम्यान, शालेय शिक्षणमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांची पालकमंत्री पदी निवड केल्यानंतर त्यांनी प्रथमच येत प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहन केले. त्यानंतर त्या तीन महिन्यानंतर हिंगोलीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्यासाठी आल्या आहेत.
कोरोनाचा प्रदुर्भाव वाढल्याने सर्वत्र लॉकडाऊन लागू केल्याने त्यांना महाराष्ट्र दिनी झेंडा फडकविण्या करिता येता आले नाही. त्या मुंबई येथे होत्या.आता हिंगोली येथे कोरोना बाधितांची संख्या शंभरी जवळ गेल्याने त्यांना चिंता लागली होती. तसेच जिल्ह्यात उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर पाणी टंचाई, रोजगार हमीची कामे, पंतप्रधान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना धान्य मिळते का नाही याचा आढावा घेण्यासाठी त्या आल्या असता रविवारी परतीच्या मार्गावर असताना विश्रामगृहावर शेकडो विविध संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी निवेदन दिले.
यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष तथा जिल्हा परिषदेचे निमंत्रित सदस्य जिरवनकर यांनी शिक्षकांच्या विविध प्रलंबित मागणीसाठी पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. त्यात नमूद केले की, शिक्षकांचे मासिक वेतन सीएमपी प्रणाली नुसार अदा करावे, लॉकडाऊन काळात दारू विक्रीच्या दुकानावर शिक्षकांच्या नियुक्त्या करू नये, चेक पोस्ट वर नितुक्त केलेल्या शिक्षकांना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार सुविधा पुरविण्यात याव्यात, कोरोना काळात नियुक्त कर्मचाऱ्यांना विमा संरक्षण तसेच आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करून दयावे,सेनगाव येथील चेकपोस्टवर पोलीस कर्मचाऱ्यांकडून केलेल्या दादागिरीची चौकशी करावी यासह विविध मागण्याचे निवेदन दिले असता, यावेळी पालकमंत्री गायकवाड यांनी मागण्या सोडविण्याचे अश्वासन दिले .
याशिवाय शासकीय बंधपत्रित अधिपरीचारिका संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. यामध्ये शासकीय बंधपत्रित अधिपरीचारिकाना नियमित सेवेत सामावून घ्यावे, जो पर्यंत सरळ सेवेत समावून घेतले जाणार नाही तोपर्यंत आजघडीला काम करीत असलेल्या परीचारिकेना नियमित सेवा सहा महिन्यांची रद्द करून अकरा महिन्याचे आदेश द्यावेत, वार्षिक वाढ दहा टक्क्यांनी मिळावी, मानधन पद्धतीचा शासन निर्णय तातडीने रद्द करावा, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेने दिले आहे. त्यानंतर आज सकाळी निवेदन देण्यासाठी विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी सोशल डिस्टन्सचे पालन करीत पालकमंत्री गायकवाड यांच्याकडे निवेदन सुपूर्त केले. यावर पालकमंत्री गायकवाड यांनी लॉक डाऊनचे कारण सांगत यावर कॅबिनेट मंत्रिमंडळात प्रस्ताव ठेवून त्यावर चर्चा केल्यानंतर आपल्या प्रलंबित मागण्या सोडविण्याचा विचार करू असे अश्वासन निवेदन कर्त्यांना दिले आहे. तर काही निवेदनकर्ते निवेदन देण्यासाठी विश्रमगृहात आले असता त्यांना निवेदन न देताच पोलिसांनी सोशल डिस्टन्सच्या नियम दाखवीत माघारी धाडले.