माळधावंडा, पाणबुडे वस्ती येथे पाण्याचे टँकर सुरू करा
जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांची मागणी
हिंगोली - एकीकडे कोरोनाचे संकट सुरू असताना काही गावात पाणी टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागत आहे. कळमुनरी तालुक्यातील माळधावंडा व पाणबुडे वस्ती (खापरखेडा) येथे पाणी टंचाई निर्माण झाल्याने या गावात टँकरने पाणी पुरवठा सुरू करावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य डॉ. सतीश पाचपुते यांनी उपविभागीय अधिकारी प्रशांत खेडेकर यांच्याकडे केली आहे.
सध्या कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन, संचारबंदी, जमावबंदी सुरू आहे. शहरासह ग्रामीण भागात देखील त्याचे पालन गावकरी करीत आहेत. मात्र काही गावात पाणी टंचाईचे संकट ग्रामस्थासमोर उभे आहे. गावातील विहीरीची पाणी पातळी खोलवर गेल्याने शेतशिवारातील विहीरीवर जावून पाणी आणवे लागत आहेत. कळमनुरी तालुक्यातील माळधावंडा व पाणबुडे वस्ती (खापरेखडा) येथे तीवृ पाणी टंचाई निर्माण झाली आहे. माळधावंडा येथील गावकऱ्यांना गावात पाणी टंचाईमुळे बोथी येथून न्यावे लागत आहेत. हे पाणी नेताना सोशल डिस्टन्स पाळणे येथे शक्य होत नाही दऱ्या खोऱ्यात असलेल्या विहीरीवर जावून पाणी आणावे लागत आहे.
दरम्यान, माळधावंड येथे विहीरीचे पाणी आणताना शितल मस्के ही मुलगी विहीरीत पडून जखमी झाली आहे. यामुळे गावात टँकरची व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे. या दोन्हीही गावचे टँकरचे प्रस्ताव पाठविण्यात आले असून ते मंजूर करून गावात टँकरची व्यवस्था करावी अशी मागणी डॉ. पाचपुते यांनी निवेदनाद्वारे केली आहे.